गावाला ना जुन्या घरांमध्ये एक कोपरा असायचा. त्याला गावाच्या भाषेत कोनाडा किंवा कोनवडा म्हणतात.
त्यातला एक, पोरं आपल्यासाठी राखीव ठेवायचे. किमान आम्ही तरी. आणि त्यात आमच्या सगळ्या खेळण्याच्या वस्तू
आणि जुन्या आठवणी असायच्या. माझ्याकडे माझ्या शाळेतल्या वह्या आहेत अजून. त्या घरातल्या एका कोपऱ्यातल्या
कपाटात आहेत. लहान असताना जी पुस्तके वाचली गोष्टींची, ती सुद्धा आहेत त्यात. माझे लहानपणीचे, अगदी लहानपणीचे
कपडे आईने जपून ठेवलेत, जुन्या कपाटात कोपऱ्यात. खूप सारे नाहीयेत पण काही खूप जवळ असणारे, गोड प्रसंग
आठवून देणारे असे. त्यातले काही तिने माझ्या भावंडांच्या मुलांना दिले तर काही तसेच ठेवलेत. कदाचित तिच्या नातवंडांना
घालण्यासाठी ठेवले असावेत.😂
असो… या सगळ्यामध्ये समान घटक आहे कोपरा. ह्या वेगेवगळ्या कोपऱ्यांशी आपल्या बऱ्याच वेगवेगळ्या आठवणी जोडलेल्या असतात.
कधी लहानपणी कोपऱ्यात घेऊन आपल्याला बडवलेलं असतं, तर मोठेपणी त्याच कोपऱ्यात जवळच्या लोकांच्या वागण्यामुळे,
काही जखम देणाऱ्या धारदार शब्दांमुळे कुणी न मारताही मुसमुसत रडत असतो आपण.
कधी हा कोपरा आपल्या काही सिक्रेट गोष्टी लपवायला मदत करतो, कधी काहीतरी सिक्रेट बोलायला आपण कोपऱ्यात जातो.
कधी हा कोपरा Physical ( भौतिक / प्रत्यक्ष ) असतो, कधी मनातला मेंटल ( अप्रत्यक्ष / मानसिक ) असतो.
Physical वाला कोपरा आणि त्यातले सीक्रेटस कधी ना कधी कळतात, कोणीतरी नकळत येऊन त्यांना तो कोपरा सापडतो
तर कधी मुद्दामहून ते शोधून काढतात. पण मनाचा कोपरा…. तो आणि त्यात लपलेलं, ते शोधणं हे सोपं नाही.
अगदी काहीच लोकांना ती कला अवगत असते. आणि आपल्या जवळच्या लोकांना तर पटकन कळतं चेहऱ्यावरून, हावभावावरून,
डोळ्यांतून. त्यातही सगळ्याच लोकांना ते शोधून नसतं काढायचं, शोधलंच तर समजून नसतं घ्यायचं…
मनाच्या या कोपऱ्यात किती काय काय लपवलेलं असतं. लहानपणीची मज्जा, शाळेतली मस्ती, मैदानातले खेळ,
वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी मारलेली शायनिंग, मग महाविद्यालयामधल्या गालावर कोवळं हसू आणणाऱ्या आठवणी,
गोष्टी भंग पावल्यावरचं झालेलं दुःख आणि मित्राच्या खांद्यावर डोकं टेकवून केलेली रडारड,
जॉब लागल्यावरची पहिली पार्टीची दृश्ये, जॉबमध्ये काही वर्ष झाल्यावर ऑफिसमधल्या पॉलिटिक्सचा येणार राग,
मग एकतर त्याला फुल्ल टक्कर दिल्यावरच्या किंवा दुर्लक्ष केल्याच्या आठवणी.. इत्यादी इत्यादी…
आपण या सगळ्या आठवणी साठवून ठेवतो पण एखादी विशिष्ट किंवा त्या आठवणींशी जुळलेली गोष्ट समोर आली
तर तो अख्खा चित्रपटच समोरून जातो. खळाळून हसतो आपण, अगदी हसून हसून पोट दुखेपर्यंत.
त्या गोष्टी जर मजेदार असतील मग त्यासोबतच्या अजून काही गोष्टी, किस्से सांगण्याची फर्माईश होते.
तसंच काही नावडती गोष्ट / प्रसंगाशी निगडित गोष्ट समोर आली तर डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही.
आणि याला पुरुष पण अपवाद नाहीत.
अमेरिकन विनोदवीर ट्रेवर नोआह (Trevor Noah) जसं म्हणतो कि स्त्रिया लगेच रडून मोकळ्या होतात,
आणि पुरुष bunch मध्ये म्हणजे बऱ्याच दुःखद गोष्टींचं एकत्र रडतात.
यालाही काही स्त्रिया अपवाद आहेत हे नक्की. अगदी माझी जवळची मैत्रीण.
कारण या कोपऱ्यातल्या ‘त्या’ आठवणींचा बांध एकदाच फुटतो आणि मग धबधबा होऊन डोळ्यांतून वाट करून देतो
त्या आवरलेल्या, कित्येक वर्षं बांधून ठेवलेल्या भावनांना. माणसांना स्वतःला धीट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये
ते बाजूला पडलेलं असतं, ते मग काही ना काही निमित्त काढून बाहेर येतंच.
आणि मला वाटतं ते बाहेर येणं गरजेचंच असतं. त्यात आपलं काही नुकसान नाही होत आणि आपण रडलो
म्हणून आपण कमजोर ठरू असं वाटत असेल तर ते बिलकुल चुकीचं आहे.
रडून आपण एकवेळ काही गोष्टी विसरू शकतो पण मनात ठेवून ते कदाचितच शक्य असतं.
माझा वैयक्तिक अनुभव आहे त्या संदर्भात. असो.
तर या सगळ्याचं सार असं की मनातल्या त्या कोपऱ्यातली जागा रिकामी करत राहा, नवीन आठवणी भरत राहा. ते olx च्या जाहिरातीत म्हणतात ना की ‘पुराना जायेगा तभी तो नया आयेगा’…. अगदी तस्सं .
आणि हो.. अजून एक. अशावेळी कोणीतरी आपलं जवळ असेल तर अशा गोष्टी आपण त्यांच्यासोबत सुद्धा वाटत असतो
त्यामुळे Google Drive ला WhatsApp चा backup रोज save होतो ना तसा त्या आठवणींचा देखील बॅकअप तयार होत असतो.
तर मग कोपऱ्यातल्या Memories ताज्या करा, त्यांचा backup घ्या आणि आपल्या HardDisk मधला
थोडा Data दुसऱ्या Device ला टाकून थोडी जागा बनवा.. नवीन डेटा साठी…
शेवटी काय ! (आठवणी) सोडून जातात ती माणसं… राहतात त्यांच्या आठवणी…
– शब्दार्थजीवन