सध्या करोना मुळे जवळजवळ सर्वच ठिकाणी परीक्षा रद्द झाल्या आहेत.
ज्यांना पुढील अगत्याच्या वर्गात जायचे आहे त्यांच्या परीक्षा कदाचित
उशिरा तरी घेतल्या जातील किंवा मागील चाचण्यांवरून त्यांचे प्रगती पत्र
तयार केले जाईल. जे विद्यार्थी प्रथम दिनापासून सजग आहेत,
योग्य अभ्यास करीत आहेत त्यांना काही चिंता नाही,
कारण त्यांचे चाचण्यांचे मार्क सुद्धा उत्तम आहेत.
असेच काहीसे उपासनेचे किंवा साधनेचे आहे असे मला वाटते.
आपण अध्यात्ममार्गावर साधनेसाठी वार्षिक परीक्षा येण्याची वाट बघतो.
पण बरेचदा होते असे की, काळ असाच आपत्तीकाल असल्यासारखा येतो.
आपल्याला परीक्षा द्यायला वेळच राहत नाही. आता जर पुढील जन्म देण्यासाठी
परमेश्वराने आपले प्रगतीपत्र तयार करायचे ठरवले, तर आमचे चाचणी परीक्षेतील
उपासनेचे साधनेचे रकाने रिकामे असतात.
मग देव कोणत्या आधारे पुढची वाटचाल देणार?
सजग उपासक म्हणूनच साधनेसाठी घटक चाचणीपासून तयार असतो,
आणि चांगले मार्कपण आणून ठेवतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत
प्रगतीपत्र उत्तमच तयार असते.
चला मग ! मिळेल तो वेळ साधनारत राहूया आणि आपले प्रगतीपत्र
केव्हाही तयार केले तरी अव्वल गुण मिळतील ह्याची काळजी घेऊया.
सौ. रूपाली साठे