ज्याने जीवनाचा कठीण असा महासागर पार केला आहे, आणि जो निस्वार्थ भावनेने इतरांनाही तो पार करायला मदत करतो तो खरा गुरु
– स्वामी विवेकानंद
गुरु !!! गुरु हा संस्कृत शब्द, ज्याचा अर्थ आहे – असा शिक्षक जो आपल्या शिष्यांचे अज्ञान घालवून त्यांना सुमार्ग दाखवतो तो. हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला. असे मानले जाते की ते आद्य गुरु होते. त्यांनी महाभारत लिहीले, वेद लिहीले.
गुरु म्हटलं की पूर्वीच्या काळातील आश्रमातील गुरु / साधू आणि आताचे शाळेतील / महाविद्यालयातील शिक्षक. पण प्रत्यक्ष जीवनात आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरुच असते. फक्त आपण त्या व्यक्तीकडून ते ज्ञान घ्यायचे की नाही हे आपण ठरवायचे असते. बस-थांबा किंवा रेल्वे-स्टेशनला एका कोपऱ्यात बसून लोकांची चित्रं काढणारासुद्धा आपला गुरु होऊ शकतो किंवा बिलकुल आवाज न करता चोरी करणारा चोर सुद्धा. आपल्यावर असतं की आपल्याला काय शिकायचंय.
आणि हो. गुरु हवाच असतो का आपल्याला ? आपण स्वतःहून काही शिकू शकत नाही का ? शिकू शकतो की. का नाही ? पण स्वतः एखादी गोष्ट समजून, ती शिकून घेण्यात जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात, पण गुरूच्या मदतीने आपण त्या गोष्टीमध्ये किंवा कलेमध्ये तरबेज होऊ शकतो. कारण गुरुकडे अनुभव असतो जो आपल्याकडे नसतो आणि त्यामुळेच कमी वेळातही त्या कलेतील बारकावे जाणून, सहज होणाऱ्या चुका टाळून आपण कठीण कला आत्मसात करू शकतो. विचार करा की व्यायामशाळेत व्यायाम करताना आपण पुस्तकं वाचून किंवा त्यात बघून मग शिकून व्यायाम करण्यात आणि आपल्या प्रशिक्षकाकडून शिकण्यात किती फरक असतो. आपला व्यायाम चुकत असेल तर तो सुधारणा करायला सांगतो किंवा काही दुखापत झाली तर प्रशिक्षक लगेच मदत करतो.
गुरुची गरज का आहे ?
सद्गुरू यांनी याबाबतीत छान उदाहरण दिले आहे. जेव्हा कोलंबस भारतात आला तेव्हा त्याला तिथेच यायचे होते का ? नाही. तो नवीन खंड शोधायला निघाला होता खरा पण नक्की कुठे जाणार हे त्याने ठरवलं नव्हतं. पण आता त्यामुळे अमेरिका आणि भारत यामधील रस्ता कोणता चांगला किंवा कोणत्या दिशेला आहे हे तरी कळले. कारण आता तो मार्ग आखलेला आहे, माहीत आहे. कोलंबस हा सुदैवी होता की तो जमिनीच्या एका टोकाला येऊन पोहोचला. कीतीतरी असे नाविक होते की ते सुद्धा असेच साहसी / शोध सफरीवर निघाले आणि परत आलेच नाहीत.
आपण सुद्धा एक प्रवासी आहोत. जीवनरूपी महासागराच्या एका टोकापासून ( जन्म ) दुसऱ्या टोकापर्यंत ( मृत्यू ) न रोखता येणारा प्रवास करणारे. या महासागरात अनेक बेटं असतील, अनेक भूभाग असतील जिथं आपण काही काळ वास्तव्य करतो. पण तुम्हाला तुमच्या त्या प्रवासाचा मार्ग माहीतीये का ? जो सुखद असेल, जिथे तुम्ही काही काळ सुखाने / शांतीने घालवू शकता, आणि त्या दुसऱ्या टोकालाही सुखद पोहोचू शकता. तो मार्ग एक गुरूच तुम्हाला दाखवू शकतो नाहीतर प्रवास दुःखद, भयानक बनवणारे खूप मार्ग असतातच ज्यात ओढले गेल्यावर बाहेर पडणं मुश्कीलच असतं, जोवर गुरुचं मार्गदर्शन प्राप्त होत नाही. म्हणूनच गुरूंची स्तुती करताना संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे –
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशालाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥३॥
अर्थ – जे आपल्या अंतर्चक्षूंवरील अज्ञानाचा पडदा ज्ञानाचे तेजस्वी अंजन टाकून हटवतात, जे आपले अंतर्चक्षूं उघडतात अशा गुरूंना माझे प्रणाम.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! – शब्दार्थजीवन