ती गोष्ट ऐकली आहे ना तुम्ही ! एका शाळेत गणिताचे शिक्षक फळ्यावर एक ते दहा या अंकांची इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहीत असतात. लिहून झाल्यावर मागे वळतात आणि मुलांना ते लिहून घ्यायला सांगतात. तेवढ्यात एक मुलगा त्यांना म्हणतो की, ” गुरुजी, ९ ची स्पेलिंग चुकलीये. nin नाही, nine अशी स्पेलिंग आहे ९ ची. ” गुरुजी हसतात आणि त्याला शाबासकी देत खाली बसवतात. ते म्हणतात की आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणारे. ते म्हणतात, ” मुलांनो, मी १ ते ८ या अंकांची स्पेलिंग बरोबर लिहिली आणि १० ची पण. पण माझी ९ ची स्पेलिंग चुकली किंवा फक्त एक अक्षर लिहायचं राहिलं. पण ते लगेच तुम्ही मला सांगितलंत. कौतुक आहे तुमचं याबद्दल कि तुम्हांला ते लगेच कळून आलं. याचा अर्थ असा कि तुम्ही मन लावून अभ्यास केलाय त्याचा. पण त्याचबरोबर मला हे पण सांगावं वाटत की जसं तुम्ही मला माझ्या एकाच चुकीबद्दल लगेच सांगितलंत तसं मी बाकीचे ९ अंक आणि स्पेलिंग बरोबर लिहिली त्याबद्दल काही बोलला नाहीत.
म्हणजे खरं तर माझं कामच आहे ते तुम्हाला योग्य ते शिकवणं. पण मला त्याबद्दल शाबासकी नाही का मिळणार ? ” मुलं स्तंभित होऊन एकमेकांकडे पाहू लागली काय बोलावं याचा विचार करून. गुरुजी पुढे म्हणाले, ” मुलांनो, गोंधळून जाऊ नका. मी ते मुद्दामूनच लिहिलं तसं. मला यातून फक्त एवढंच सांगायचंय कि तुम्ही कितीही चांगलं वागलात तरीही जग तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतं. ती संधी मिळाली तर तुमच्या बाकीच्या चांगल्या कामाकडे कोणी पाहत नाही. तुमच्यावर त्या एका चुकीमुळे टीकाच होते. त्यामुळे शक्यतो ती चूक करण्याचं टाळा. कधीकधी आपल्यावर असे प्रसंग येतात की आपल्याला सुचत नाही काय करायचं किंवा नाईलाजास्तव काहीतरी करावं लागतं. पण त्यावेळी आपल्याला ठरवायचं असतं की आताच्या क्षणिक / क्षणभंगुर सुखासाठी आपण आपली प्रतिमा मलिन तर नाही करत आहोत ? त्यामुळे आपल्या तत्वांशी प्रामाणिक आणि निष्ठावान राहा.
समजा ती चूक झालीच तुमच्याकडून तरीही तुम्ही झालेल्या चुकीबद्दल जबाबदारी घेतली पाहिजे, कबुल केलं पाहिजे. त्याने तुम्हाला त्या चुकीबद्दल माफी मिळू शकते, कदाचित होणारी शिक्षाही कमी होऊ शकते. पण चुकी आणि गुन्हा यात फरक असतो हे पण लक्षात घ्या, त्यात गफलत करू नका. नाहीतर गुन्हा कबुल केला तरीही माफी मिळू शकते किंवा शिक्षा कमी होऊ शकते असा गैरसमज करून घ्याल.
तुम्ही जेव्हा ती चूक कबुल करता तेव्हा पुढच्या संभाव्य चूका टाळता येऊ शकतात. जसं की दोन भावंडं मस्ती करताना घरातलं काही सामान फुटलं आणि पालकांनी विचारलं तर खरं सांगितल्यास ओरडा कमी मिळू शकतो.. पण खोटं बोललं, लपवलं तर त्यांचा राग अनावर होऊ शकतो… आणि जेव्हा ते समोर येतं तेव्हा तुम्हाला ओरडा खावा लागेल किंवा मारही.
आपण जेव्हा आपल्या जीवनात काही चूक करतो ज्याचा दुसऱ्या व्यक्तींवरही परिणाम होतो, खासकरून त्यांच्या मनावर,तेव्हा ती चूक करताना किंवा असं म्हणू कि ती चूक होण्याला कारणीभूत असणारा निर्णय तुम्ही जबाबदारीने घेतला पाहिजे. कारण तुम्ही नाही सांगू शकत की ती एक चूक समोरच्या आयुष्यावर आणि पर्यायाने त्यांच्या मनावर किती आणि कसा परिणाम करेल. आपण जरी माफी मागितली तरीही खरंच त्या व्यक्तीचं झालेलं नुकसान भरून निघू शकतं का याची खात्री किंवा किमान काळजी तरी केली पाहिजे.
