आपण जाती हा पाया वापरून काहीही बांधू शकत नाही. आपण राष्ट्र तयार करू शकत नाही. आपण नैतिकतेची निर्मिती करू शकत नाही. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी ब्राह्मण, मी मराठा, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी सोनार, मी चांभार, मी कुंभार.. मी हा, मी तो… एक ना अनेक… या जातींमुळे आजपर्यंत ना कुणाचं भलं झालंय किंवा पुढे कधी होईल. आजवर बऱ्याच लोकांना या जातींमुळे त्रास सहन करावा लागला, काहींना जीव गमवावा लागला, काहीजणांनी या जातपद्धतीला नष्ट करण्यासाठी खूप संघर्षात्मक लढा दिला आणि काही त्यात जिंकले. पण तेसुदधा त्या व्यक्ती या जगातून निघून गेल्यावर. जेव्हा त्यांनी मांडलेले विचार सत्यात आले, लोकांनी परिणाम भोगले तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की याबद्दल आपल्याला जागरूक केलं होतं पण आपण न ऐकल्यामुळे असं झालंय हे.
या शब्दाचा खासकरून मला खूप राग येतो. या शब्दामुळे माझ्या आयुष्यातून बऱ्याच गोष्टी मी गमावल्या आहेत ज्या मला प्राणप्रिय होत्या. लहानपणापासून, जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून एकमेकांची जात विचारणं हा प्रकार मला आवडायचा नाही.. अजूनही आवडत नाही.. ” तुझं आडनाव काय बरं ? “, सोबत फिरणाऱ्या, समाजासाठी वेगळ्या जातीतल्या किंवा धर्मातल्या मित्रांपैकी एकाला विचारलेला प्रश्न. मग त्याने आडनाव सांगितलं की अच्छा, मग तू अमूकअमुक समाजातला का ? काहीजण मोठ्या अभिमानाने सांगतात आणि काहीजण सांगतात साधेपणाने, पण त्यांचं उत्तर ऐकून बऱ्याचजणांचं त्यांच्याबद्दचं मत बदलतं किंवा त्यांच्याबद्दल तुच्छतेची भावना तयार होते. पण जर मला विचारलं तर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहूनच समोरचा प्रश्न विचारणं बंद करेल..
बरं, लोकं एवढ्यावरच थांबली असती तर ठीक. पण कसलं काय ?? लोकांचा एखाद्या विशिष्ट समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरलेला असतो.. कोण ? तो ना ? अरे तो शेवटी अमुकअमुकच ( समाजाचं नाव ),ते काय कधी सुधारणार नाहीत, अरे ते खूप घाणेरडे राहतात आणि अजून खूप काही. मी अशी बरीच बोलणी ऐकली नाहीयेत आणि ती खूप खालच्या दर्जाची असल्यामुळे नाही ऐकलं तेच बरं वाटतंय. पण त्यांना काही उदाहरणं दिली ना तर त्यांची तोंडं बंदच व्हायला पाहिजेत. होतात पण बऱ्याच जणांची, पण काहींना असं काही सांगून काहीच उपयोग नसतो. खरंच आजकालच्या लोकांची मनस्थिती इतकी बिघडलीये की त्यांना कशाचाच परिणाम होत नाही. अपघात झाला रस्त्यात तर अपघातग्रस्तांना उपचार देण्याऐवजी त्याचं छायाचित्रण करणारी गर्दी जास्त असते. असं काही बघितलं की त्या अपघातग्रस्तांची दया येते आणि त्या बघ्यांची कीव.
आज जात हा शब्द वापरला तर वाईट वाटतं म्हणून समाज हा शब्द वापरला जातो. ” काय रे ? तू कोणत्या समाजातला ? ” किंवा ” अच्छा !! तू या समाजातला का ?? ” ही काही उदाहरणं. जातींमुळे लोक विभागले गेलेयत. खरंतर लोकांचे व्यवसाय, यामुळे त्यांचे वेगवेगळे गट पडले आणि मग ते त्यातले कुशल व्यावसायिक झाले. त्या व्यवसायावर त्यांचं पोट भरू लागलं आणि त्यांच्या वंशजांनी सुद्धा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू ठेवला. परंपरा म्हणून. कालांतराने त्यांचे वंशज काळासोबत सुधारले, पुढारले. त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं. काही चांगल्या नोकरीला लागले तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कुणी वडिलोपार्जित व्यवसाय मोठा केला किंवा त्याला वेगळं वळण दिलं आणि काहीजणांनी परंपरा बाजूला ठेवून इतर व्यवसाय सुरू केले. यामध्ये झालं असं की घेतलेल्या शिक्षणामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना समाजात मान मिळाला. आणि हा समाज म्हणजे फक्त ” त्यांचा ” समाज नाही, तर सामुदायिक समाजात. पण खरं सांगायचं तर ही अशी लोकं मोजकीच आहेत पण बाकीच्यांना अजूनही तशीच वागणूक मिळतेय.
मला आठवतंय, लहानपणी, गावच्या ठिकाणी, काही लोकांना देवघरात जिथे गणपती बसवलेला असे तिथे प्रवेश नसे. मी कुतूहलाने विचारलं की असं का ? आम्ही तिथे जाऊन देवबाप्पाजवळचा मोदक चोरून खाल्ला तरी चालतो पण त्यांना त्या खोलीत पण जाऊ द्यायचं नाही. बाहेरूनच पाया पडायचं त्यांनी. तर त्यावर उत्तर असं की ” अरे ते अमुकअमुक जातीचे आहेत ना म्हणून त्यांना आत प्रवेश नाही. ते तिथे आत गेले तर देवाला चालणार नाही. कोप होईल देवाचा. आंघोळ करून परत पूजा करावी लागेल “. आणि बहुधा हे खूप आधीपासून चालत आलेलं असावं कारण त्यांना तिथे अडवायला कोणी नव्हतं ना कुणी सांगायला की तुम्ही आत जाऊ शकत नाही. पण ते आपणहून आत जात नव्हते. एकतर त्यांच्या मनातून ती न्यूनतेची भावना गेली नसावी किंवा त्यांना तशी सवय लागून गेली असावी. काहीजण आधी झालेल्या काही प्रसंगामुळे आत जात नसावेत किंवा त्यांना तो प्रसंग पुन्हा किंवा किमान आपल्याबाबतीत होऊ नये या भीतीमुळे. पण ते मला पटायचं नाही. देवाजवळ सगळे सारखे. कुणी उच्च नाही कुणी नीच नाही. पण पूर्वीपासून मनावर जातीवादाचा पगडा असलेल्या लोकांना हे सांगणार कोण आणि सांगितलं तरी त्यांना पटणार तरी कसं ? झोपलेल्याला उठवता येतं हो, पण जो झोपेचं सोंग करतोय त्याला तुम्ही कसं उठवणार ?
अशाच काही सोंगांमुळे आणि ढोंग करणाऱ्यांमुळे आंतरजातीय विवाहाचा मोठा बाऊ केला जातो. हो ढोंगीच ! काहीजण मुद्दामूनच आपल्या समाजाचा मोठेपणा दाखवत फिरत असतात. मी अमुक अमुक समाजाचा. मग आमची जात मोठी, तुमची जात छोटी. त्यात ते काय साध्य करतात माहीत नाही पण त्यामुळे काहीजणांना आपल्या मनपसंत व्यक्तीशी विवाह करता येत नाही. कारण फक्त एवढंच की तो/ती दुसऱ्या जातीतली आहे. मुलगा किंवा मुलगी so called खालच्या जातीतील आहे. “असं केलं तर आपल्या तोंडात लोकं शेण घालतील “, ” अरे लोक काय म्हणतील ? “, ” आधी किती शहाणपणा करत मिरवत होता आणि आता काय केलं तिने /त्याने ? घरच्या इज्जतीची केली ना माती ? “.
ही आणि अशी बरीचशी वाक्य ज्यांच्या प्रेमप्रकरणाची खबर घरच्यांना लागलीये आणि त्यात ते आंतरजातीय असेल, ( नवीन संकल्पना – आंतरजातीय प्रेमप्रकरण ) तेव्हा उदाहरणं म्हणून दिली जातात. आणि जर कुणी विरोधाला सामोरे जाऊन केलाच विवाह, तर मग त्याचे दुष्परिणाम त्या बिचाऱ्या नवविवाहित जोडप्याला भोगावे लागतात. एकतर त्यांना ( अप्रत्यक्ष ) वाळीत टाकलं जातं, गावातल्या आणि समाजातल्या लोकांकडून. आणि घरच्यांकडून सुद्धा कारण त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे घरच्यांची इज्जत गेलेली असते ( घरच्यांच्या मतानुसार). घरातल्या लोकांना सुद्धा इतर लोकांची बोलणी ऐकावी लागतात, टोमणे ऐकावे लागतात ज्यामुळे त्रस्त होऊन त्यांचा त्या जोडप्यावरचा राग अजून वाढतो. याचे काही प्रभावशाली दुष्परिणाम म्हणजे :
1. हॉनर किलिंग – जसं’ सैराट ‘ चित्रपटाचा शेवट दाखवून दिग्दर्शकाने एक धगधगता प्रश्न समाजापुढे आणून ठेवला जो की समाजाला नवीन नाहीये पण तो असा सर्वांसमोर कधी आलाच नव्हता, जसा की त्या चित्रपटाच्या माध्यमातून आला. त्यात लग्न करून आपलं घर सोडून दुसरीकडे आपला संसार वसवलेल्या जोडप्याला त्यांच्या छोट्याशा, मेहनत करून बांधलेल्या घरात, त्यांचं एक छोटं मूल असताना सुद्धा त्यांचा खून झाला. फक्त एवढ्यासाठी की ज्यांनी आमचं नाव खराब केलं त्यांना आम्ही सोडणार नाही किंवा त्यांनी आमचं नाव खराब केलं म्हणून. समाजातला मोठेपणा तसाच राहण्यासाठी. पण यासाठी लहानाची मोठी केलेली मुलं, त्यांची स्वप्न, आवडनिवड यांचा काहीच विचार तेव्हा होत नाही. काहीच भान नसतं तेव्हा, असतो तो फक्त राग, क्रोध आणि सुडाची भावना.
2. मुलगी किंवा मुलाकडच्या नातेवाईकाची आत्महत्या – आपली मुलगी किंवा मुलगा असं वागली किंवा वागला आणि ते सहन न झाल्याने, पुढील सर्व टोमण्यांना, बोलण्यांना टाळण्यासाठी, किंवा ते ऐकून मनावर परिणाम झाल्याने अशी कृती होते.
अजून अशा बऱ्याच प्रतिक्रिया उमटतात असे विवाह केले तर.
आणि कधीकधी इतरांनी केलेल्या या कृतीची भीती दाखवून मुलांना अडवलं जातं. उदा. तू करच असं काही, मग बघतो तुला ? किंवा तू जर असलं काही केलंस तर माझं मेलेलं तोंड पाहशील !!! अरे असं बोलण्याआधी मला एक विषाची बाटली दे आणून आणि घे माझा जीव .. देवा !! काय दिवस आणलेस रे परमेश्वरा… ??? अगं, इतके कष्ट काढून तुला लहानचं मोठं केलं, ते हा दिवस बघण्यासाठी ??
असे अनेक डायलॉग तयार असतात. बरीच लोकं यात फक्त भीती घालण्याचं काम करत असतात.. आणि अगदी काही लोकं तसं करण्यास धजावतातही. पण यातून एकतर त्यांच्या मनासारखं होतं आणि मुलं थांबतात तिथंच. किंवा मग सगळं धुडकावून लावून लग्न करतात आपल्या पसंतीच्या मुला/मुलीशी.
पण जी मुलं थांबतात त्यांची कुचंबणा होते. त्यांना आपलं मन मारून जगावं लागतं. केवळ घरच्यांचं मन राखण्यासाठी केलेला विवाह म्हणुन ते सुद्धा सफल होत नाही आणि सगळ्याचंच नुकसान होतं. नंतर मग पालक बोलत राहतात की याचं / हिचं लग्न पाहिजे होतं त्याच्याशी करून दिलं असतं तर किमान तेवढं तरी सुख असतं..
हे झालं आंतरजातीय विवाहबद्दल. झालं म्हणजे अजून बरंच आहे पण आपला तो विषय मूळ नाहीये.
तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जातीनिहाय आरक्षण.
आता तसं कोणत्याही जातीबद्दल किंवा त्यासाठी मिळणारं आरक्षण याबद्दल उघडपणे बोलणं म्हणजे आज नामुष्की झालेय. याच विषयी नाही तर इतरही अनेक प्रश्न ज्यावर एक जबाबदार नागरिक म्हणून बोलणं आणि प्रश्न विचारणं आज कठीण होऊन बसलंय. मुस्कटदाबी केली जाते आणि गुंड प्रवृत्ती नसानसांत भिनल्याने कोणी तसं करणाऱ्यांच्या वाटेला पण जात नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे कायदे नमूद केले होते किंवा जी तरतूद केली होती मागासवर्गीय लोकांसाठी, ती केवळ काही काळापूरतीच मर्यादित ठेवली होती आणि त्यानंतर योग्य ती कृती त्यावर करणं अपेक्षित होतं पण काही स्वार्थी राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी ती तरतूद कायम तशीच ठेवली आणि त्या समाजाला अधुच ठेवलं. त्यांना स्वत्वाची, स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव होऊच दिली नाही. त्यांना स्वतःलाच कमीपणाची भावना जाणवू दिली आणि बऱ्याच सवलती ज्या चालू होत्या त्यामुळे जवळजवळ आयतंच किंवा सोपेपणाने मिळणारं घ्यायची सवय लागली. आणि मग हळूहळू इतर समाजावर त्या तरतुदींमुळे अन्याय होतोय असं दिसण्यात येऊ लागलं आणि मग सुरू झाला संघर्ष. आरक्षण मिळवण्यासाठी. त्यातही बऱ्याचजणांनी आपली पोळी भाजून घेतली त्या तव्यावर. काहीवेळा त्यामुळे संघर्ष पेटला, वेगळं वळण लागलं आणि बरंच नुकसान झालं. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर, सरकारी मालमत्ता जी सामान्य जनतेच्या भरल्या जाणाऱ्या करातूनच तयार होत असते, तिचंही. पण यातून निष्पन्न एवढंच होत की समाजातली दुरी वाढत जाते आणि खोल दरी तयार होते जी भरून काढण्यासाठी अजून एका संघर्षाची गरज असते.
खूप सोप्या गोष्टींना लोक खूपच किचकट करून ठेवतात. आपण सगळे माणूस आहोत. मान्य आहे की जातींची निर्मिती काही कारणास्तव झाली, उगाच वेळ जाण्यासाठी नाही केलं हे सगळं कुणी. पण आज आपल्या देशाची, जगाची जी अवस्था आहे ती पाहून आपण हे सगळे नियम किंवा प्रथा परंपरा बाजूला ठेवू नाही शकत का ? दुसऱ्या माणसाच्या खऱ्या समस्येवर आपण काही करू शकत नाही का ? का आपण कधीतरी एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला समजून नाही घेऊ शकत ? माणुसकी नाही दाखवू शकत ? की अजूनही त्या जातीपातीच्या विळख्यात आपल्याला अडकायचंय. आहेत अजून तसे बरेच लोक. जीव गेला तरी बेहत्तर पण जात आणि जातीचा माज नाही सोडणार. अरे वेड्यांनो, मरणोपरांत कोणी जात नाही विचारत. सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं असतं. या जगाच्या बाहेर कुठेतरी. पण कदाचित काही मंडळी इथेही तर्क लढवतील. ” तो या समाजाचा ना, मग त्याचे अंतीमसंस्कार इथे नाही करत येणार. त्यांचं वेगळं स्मशानभूमी आहे किंवा दुसरीकडे पहा.”
जीवन हे अनमोल आहे. त्याचा जितका आनंद घेता येईल तितका घ्यायचा तर हे स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणारे लोक नको त्याविषयावर चकाट्या पिटत बसून स्वतःचा, सोबत इतरांचाही वेळ वाया घालवतात.
जे जाती मानतात आणि पाळतात, त्यांचं जीवन किती असहाय्य होईल जर त्यांच्या म्हणण्यानुसार असलेले खालच्या किंवा शूद्र जातीचे लोक नसते तर.. ??
त्याचीच एक छोटी गोष्ट…
एके दिवशी एका पंडिताला तहान लागली आणि नेमकं त्याच वेळी घरी पाणी नव्हतं. म्हणून त्याची पत्नी शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन आली. पाणी पिऊन पंडिताने विचारले,
पंडित – कुठून घेऊन आलीस पाणी ? खूप थंड आहे.
पत्नी – शेजारच्या कुंभाराच्या घरातून. ( पंडिताने हे ऐकल्याबरोबर पाण्याचा लोटा फेकून दिला आणि त्याला खूप राग आला. तो जोरजोरात त्याच्या पत्नीवर ओरडू लागला.)
पंडित – अरेरे !! तू तर माझा धर्म भ्रष्ट केलास. कुंभाराच्या (शूद्र) घरातलं पाणी पाजलंस मला.
पत्नी घाबरून थर-थर कापू लागली आणि तिने पतीची माफी मागितली.
पत्नी – यापुढे अशी चुकी नाही होणार. मला माफ करा.
संध्याकाळी जेव्हा पंडित घरी आला, आणि जेवायला बसला तेव्हा घरी काहीही जेवण केलेलं नव्हतं.
पंडित – आज काहीच जेवण का नाही केलेलं ?
पत्नी – भाकरी बनवली होती, पण ज्याने तांदूळ उगवला तो कुणबी (शूद्र) होता. आणि ज्या कढईमध्ये भाजी बनवली होती ती लोहाराच्या (शूद्र) घरून आली होती. म्हणून मी सगळं फेकून दिलं.
पंडित – तू वेडी-बिडी झालीस की काय ? कुठे धान्य आणि कढईमध्ये मध्ये विटाळ होतो का ?
असं म्हणून पंडित म्हणाला, ” जा, किमान पाणी तरी घेऊन ये.
पत्नी – पाणी तर घरात नाही आहे.
पंडित – का ? पाण्याचे घडे कुठे गेले ?
पत्नी – ते तर मी फेकून दिले कारण ते कुंभाराने बनवले होते.
पंडित म्हणाला, ” दूध तरी घेऊन ये.. ते तरी आहे का ?
पत्नी – दूध पण फेकून दिलं. कारण गायीला ज्या नोकराने धुतलं होतं तो तर नीच ( शूद्र) जातीतला होता ना.
पंडित – आता तर हद्दच झाली. तुला हे पण कळत नाही का कि दुधाला पण विटाळ नसतो.
पत्नी – हे असं कसं हो बोलता तुम्ही ? पाण्याने विटाळ होतो पण दुधाने नाही ?
पंडिताला तर आता असं वाटू लागलं कि आता समोरच्या भिंतीवर जाऊन डोकं आपटून घ्यावं .
तो रागातंच म्हणाला – तू माझं डोकं फिरवलं आहेस. जा आता, अंगणात खाट मला. मला आता झोप येत आहे.
पत्नी – खाट ? ती तर मी तोडून फेकून दिली कारण ती तर सुताराने ( शूद्र ) बनवली होती.
पंडित जोरात किंचाळून म्हणाला – अरे देवा !!! जा, फुलांचा हार घेऊन ये. देवाला घालतो ज्याने तुला थोडी तरी अक्कल देईल देव.
पत्नी – फेकून दिला. तो माळ्याने (शूद्र) बनवला होता.
पंडित – एक काम कर. सगळ्याला आग लावून टाक . घरात काहीतरी ठेवलं आहेस कि नाही ??
पत्नी – हो. हे घरंच राहिलंय आता.हे अजून तोडणं बाकी आहे. कारण हे पण मागासलेल्या जातीमधल्या मजुरांनी बांधलंय.
पंडिताकडे आता काहीच बोलण्यासारखं राहिलं नव्हतं. आता त्याचे डोळे उघडले होते आणि त्याच्या पत्नीने असं का केलं हे त्याला कळालं होतं.
विचार करा – जर आपणसुद्धा असाच विचार केला कि समाजाने ज्या जातीतल्या लोकांना शूद्र मानलंय, त्यांच्या स्पर्शाने विटाळ होतो, तर आपण आपलं दिनक्रम पूर्ण करूच शकत नाही. जसं जेवण करताना प्रत्येक वस्तूला महत्व असतं तसंच समाजातल्या सर्व व्यक्तींची आपल्याला गरज असते आणि तसंच त्यांचं महत्वही असतं. विचार करा कि मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये साफ सफाई करणारे कामगारच नसते तर कधी ना कधी त्या कंपनी मध्ये सुद्धा कचरा दिसला असता. त्यामुळे आपल्या मनातला कचरा पहिला काढून टाका, डोळ्यावरची जातीची बांधलेली पट्टी काढून टाका, तरच तुम्हाला समाजात असलेला चांगुलपणा दिसेल, माणुसकी दिसेल.
मित्रांनो, खूप मोठा लेख झाला असल्यास माफी असावी पण इथे अजून खूप मुद्दे मांडले नाहीत जे वाढतच गेले असते. या लेखाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा…
– शब्दार्थजीवन
