तोच नरनारायण शोभतो खरा…!!!

विश्वाची जननी तू, आदिमाया आदिशक्ती,
विश्व जणू भुलले हे करावया तुझी भक्ती…

जिची करावया हवी पूजा,
मान तीस मिळतो दुजा,
जीवन जी देते बीजा,
नशिबी तिच्या फक्त झीजा…

आय-माय, भगिनी स्नुषा,
जगण्यास जी देते दिशा,
नराधम काही झाले पैदा,
जयांनी केली तिची विदीर्ण दशा…

तिच्याविना ना जगण्यास अर्थ,
तिच्याविना ना जगास अर्थ,
सहनशक्तीचा होता अंत,
करील नष्ट जगास एवढे सामर्थ्य…

अशा नारीशक्तीला बांधून ठेवले दावणीला,
अहंकार नि अधिकार पुरुषी, जगास दावण्याला,
नसे कल्पना किंचितही त्यांस,
जरी देईल प्रेम अपार परी सक्षमही करण्या तुमचा विध्वंस…

किती अत्याचार करशील तिजवर
तिचा देहच ज्वालामुखीचा,
शीतलतेने तिच्या प्रेमाच्या
आवरून त्या आगीला,
जरी ऊब देते तुला,
भस्मसातही करु शके क्षणमात्रात तुजला…

येई भानावर वेळीच रे नरा,
सखी असे, सोबतीण असे तुझी, समजून घे पामरा,
यथोचित सन्मान जो देई नारीला,
तोच नरनारायण शोभतो खरा…!!!

– शब्दार्थजीवन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top