सध्या एका व्यापाऱ्यांनी देवाची वस्त्रे शिवण्याचं काम दिले आहे.
त्यासाठी घरातील व मैत्रिणीकडील कापडाचे वेडेवाकडे तुकडे जमा केले.
त्याला व्यवस्थित आकारात कापले, अस्तर लावले, शिवण घातली,
सोनेरी काठ लावले व शेवटी बंद म्हणून चेन किंवा हुक व बटणं लावून हे वस्त्र तयार झाले.
हे करता करता काही सुचले म्हणून लिहले –
पंचमहाभूतांमधून देवाने कैक विभूती घडविल्या,
उरलेले काही भाग त्याने आईच्या उदरी टाकले,
नऊ महिने तिनेही छान सांभाळून एक देहास आकार दिला,
जन्मल्यावर तिच्या प्रेम-पान्ह्याचे अस्तर छोट्याश्या देहास लावले,
वडील व नातेवाईक ह्यांनी संस्कारांची शिवण घातली,
योग्यवेळी ज्ञानार्जनाने त्याला सोनेरी काठ लावले,
श्रद्धेच्या कातरीने ज्ञानाचे वाढीव भाग तासले,
एक सुंदर शे वस्त्र जणू देवसेवेसाठी तयार झाले,
घातले प्रभूच्या देहावर ते पण निसटू तेथून लागले,
मग सद्गुरूने त्याला भक्ती चे बंद लावले,
आता जेव्हा अर्पण केले परमेश्वर सेवेस,
त्यालाही खूप ते भावले,
उबेसाठी माझे देह वस्त्र त्याने उराशी कवटाळून ठेवले.
🙏🏻🙏🏻 सौ रूपाली साठे