प्रेमात असतो राग-रुसवा आणि थोडीफार मस्ती,
पण करू नका कधीही प्रेमाची जबरदस्ती …
अनेक कथा-कादंबऱ्या झाल्या प्रेमावरती,
मैत्रिकडून प्रेमाकडे जाणाऱ्या वाटेला नसते कधी परती …
अशीच एक गोष्ट आहे त्या दोघांची,
मैत्रीच्या पावसात चिंब भिजणाऱ्या त्या मेघांची…
होती त्यांच्यात घनिष्ठ अशी मैत्री,
तो काहीही झालं तरी तिला समजून घेईल,ही होती तिला खात्री…
त्याचप्रमाणे तो घेत होता प्रत्येकवेळी तिला समजून,
पण तो तिच्या प्रेमात आहे हे नाही आले तिला उमजून…
असेच तिचे मैत्रीचे दिवस जात होते,
त्याच्याकडून मात्र प्रेमाचे वारे वाहत होते…
बऱ्याच दिवसांपासून त्याला ते सांगायचे होते,
पण कसे सांगावे हेच कळत नव्हते …
धीर करून त्याने तिला त्याच्या मनातले सांगितले,
आणि तिच्याकडून त्या प्रश्नाचे उत्तर मागितले…
तिचे उत्तर ऐकताना धडधडत होती त्याची नस,
पण तिला मैत्रीच्या पलीकडे जाण्यात अजिबात नव्हता रस…
तिचा नकार ऐकून त्याचे हृदय तुटले,
त्याच तुटलेल्या हृदयाला घेऊन त्याने त्याचे घर गाठले…
त्याला नकार देताना वाईट वाटले खूप तिलाही,
मैत्रिपलीकडे कधी तिने विचार केला नव्हता जराही…
त्याला मनवण्यासाठी ती प्रयत्न करू लागली हजार,
पण तो करायला लागला तिच्या मैत्रीचा बाजार…
तिला मिळवणं हाच आता बनला होता त्याचा ध्यास,
ती मात्र लावून बसली होती मैत्रीची वेडी आस…
उठता बसता तो द्यायचा तिला त्रास,
स्वप्नातही व्हायचा तिला त्याचा आसुरी भास…
कंटाळून तिने प्रयत्न केला इतरांशी संवाद साधण्याचा,
दुर्लक्ष करून त्याला डावलण्याचा…
तिला कळत नव्हते हा तोच आहे की बहुरूपी,
कारण तो खेळत होता तिच्या आयुष्यात अमानुषपणे लपाछपी…
तोच जाणे त्याला असं वागून काय मिळालं,
” मैत्रीचं ” मोल मात्र ती गेल्यावरच कळालं….
मैत्रीचं मोल मात्र ” ती ” गेल्यावरच कळालं….
– निवडुंग
