भांडण (- आईसोबतचं )

घरात भांडी असली तर भांड्याला भांडं लागणारच हा वाक्प्रचार हल्ली खूपच प्रमाणात आढळतो आहे, नाही ? आणि या भांडणाला वेगवेगळी रूपं, ठिकाणं, कारणं असतात. त्यात समाविष्ट व्यक्ती वेगवेगळ्या स्तरातल्या असतात. जसं सिग्नलवर होणारी, रस्त्यात कोणी गाडीला धक्का मारला म्हणून होणारी, नवरा बायको मधली, सासू-सुनेमधली, संपत्तीच्या वाट्यावरून भावा-भावात होणारी आणि अजून कित्येक नात्यांमध्ये तसेच अनोळखी लोकांसोबत होणारी.
पण यांच्यापैकी कुणाशी झालेल्या भांडणापेक्षा सगळ्यात वेगळं, निराळं असं भांडण म्हणजे आईसोबत होणारं भांडण. किंवा काहींचं बाबांसोबत होणारं भांडण कारण काहींना बाबा जास्त प्रिय असतात. आणि हे शक्यतो लहानपणीच हा. मोठेपणी अशी भांडणं होणं दुर्मिळ असतं. तर होतं काय ? आपलं आईसोबत कशावरून तरी भांडण होतं, चूक आपली असते, आई ओरडलेली असते पण आपल्याला वाटत असतं की आपण बरोबरच होतो. मग आपली होते आईशी कट्टी. आणि मग सुरु होते खरी गंमत. 

आता कट्टी घेतलीये म्हंटल्यावर बोलायचं नसतं पण सगळी कामं तर आईच करून देत असते. मग आता ? मग सुरु होतो खेळ मध्यस्थाचा. आईशी सरळ बोलता येत नाही म्हणून घरातले आजी-आजोबा, बाबा, दादा-ताई यांचं नाव घेऊन बोलायचं, पण ते असतं मात्र आईसाठी. खरंतर तोपर्यंत आपला राग शांत झालेला असतो आणि कट्टी पण मोडायची असते पण इगो असतो ना, माघार घ्यायची नसते. मग “आजी, माझे शाळेचे कपडे कुठे आहेत ?” इथपासून माझं हे, माझं ते.. इथपर्यंत.  आई ते ऐकते, हसते आणि काम पण करून देते. मग हे कधी कधी ते आजी-आजोबांसोबत बोलते आणि मग ते पण हसतात. आणि आपलं त्यात वरून बोलणं असतंच कि “ तू का माझी कामं करतेयस ? मी नाही बोलत आहे ना तुझ्याशी ? “ पण तरीही आई आपली कामं करून देते. 

पण खूप दिवस होऊनही आपण तेच तुणतुणं लावून बसतो तेव्हा मात्र आई युक्ती करते. एकेदिवशी आई आपली परीक्षाच घ्यायचं ठरवते. खरंच बोलायचं बंद करते राव !!! आणि मग काय ? एक-दोन दिवसातच आपण सफेद झेंडा घेऊन माघार घ्यायला भाग पडतो. पण आता आईने आपल्याशी कट्टी घेतलेली असते. खोटी-खोटीच. आणि आता आजी-आजोबा / बाबा पण त्यात सामील असतात. या एक-दोन दिवसात आई आपल्याकडे ना बघते ना कुठलं काम करून देते. ( म्हणजे करते तीच पण आपल्या माघारी आणि दुसऱ्यांना सांगेल द्यायला ). मग सुरु होतं आईच्या मागे मागे फिरणं. आई बोल ना.. बोल ना गं आई.. !! तिच्या पदराला धरून तिला बोलायला सांगणं. आपण जरी आजी-आजोबा / बाबांना सांगितलं तरी ते तिच्याबाजूने असतात. आपण म्हटलं कि, “तिला सांगा ना माझ्याशी बोलायला”. तेव्हा ते म्हणतात की, “ अरे तूच घेतलीस ना कट्टी ? मग तूच सांग कि. “. मग शेवटी एकदा रडकुंडीला आलेलं बघितल्यावर आई खोटी कट्टी सोडते आणि सुरुवात करते बोलायला. मग हिरमुसलेलं, फुसूफुसू रडणारं बाळ तिच्या कुशीत शिरतं आणि तेव्हा कुठे आपला जीव भांड्यात पडतो. 

तुम्ही कधी केलंय का असं आपल्या आई / बाबांशी भांडण आणि कट्टी ? केलं असेल तर नक्की सांगा कंमेंट्समधून. 

– शब्दार्थजीवन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top