
आज काही भाषा दिन वगेरे नाही पण हल्ली असे ठरवले आहे मनात जे सुचेल ते लिहायचे.
तसे लिहणे म्हटले की कागद पेनाची नितांत गरज पण जास्त काळ टिकवण्यासाठी आणि
ती जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे डिजिटल माध्यम वापरावेसे वाटते. असो.
आजचा विचार म्हणजे भाषा माझी माऊली. तसे म्हणायचे तर मी मराठी कोकणस्थ ब्राह्मण,
म्हणजेच की मराठी मातृभाषिक. पण मागील तीन पिढ्यापासून गुजरात मध्ये स्थायिक झाले
म्हणून ती ही माझी मातृभाषाच म्हणावी लागेल.शिक्षण सगळे गुजराती मध्ये झाल्यामुळे
त्या भाषेची जाण आणि त्यातील वावर जास्त होता. घरातील वातावरण पण गुजराती च म्हणावे लागेल,
परंतु आई आणि वडिलांचा कटाक्ष होता जी भाषा बोलाल किंवा लिहाल ती शुद्ध असावी, सरमिसळ नको.
काही वया नंतर आयुष्यात हिंदी ची ओळख झाली. लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे थोडे फार
संस्कृत ही कळत होते. आयुष्यात इंग्रजी ने ही शिरकाव करू पहिला पण त्याबद्दल का माहीत नाही
पण तेवढी गोडी नाही वाटली. तुम्हाला वाटेल मी का लिहितीये हे, पण सांगावेसे वाटते कि आज आपण
एकभाषिक असलो तर त्याचा अभिमान मिरवतो पण त्याने आपण किती मुकतो याचा कधी विचारच करत नाही.
एवढ्या भाषांच्या वावरामुळे मला काय मिळाले सांगू? मी जितक्या प्रेमाने किंवा आत्मीयतेने समजून
जनाबाईंचे अभंग म्हणते तितक्याच प्रेमाने गंगासतीची भजने म्हणून अनुभवू शकते.
ज्या गोडव्याने भूपाळी ऐकते त्याच भावाने प्रभातीये पण. ज्या तन्मयतेने ज्ञानेश्वरी ऐकू शकते
त्याच तन्मयतेने गुजराती सुदामा चरित्र पण ऐकते. एवढे सगळे लिहिण्याचे कारण एकच की
ज्या भाषांच्या ज्ञानामुळे आपण विविध संस्कृतींमध्ये लीलया वावरू शकतो, त्यांच्या कलाकृतींचा
आनंद घेऊ शकतो त्या सगळ्याच आपल्या माऊली असायला हव्या ना? मग आपण त्याचे वाडे का बांधतो?
आपल्याला इतर भाषा येत असूनही जी भाषा जातीची ओळख देते तीच मातृभाषा का?
मला पु. लं.च्या विनोदाने गुदगुल्या करणारी मराठी जशी माझी, तशी तारक मेहता वाचल्यावर
मुक्तपणे हसवणारी गुजराती ही माझीच. रहीमचे, मीरेचे दोहे समजावणारी हिंदी माझी,
तशी शंकराचार्यांच्या स्तोत्राचा अर्थबोध देणारी संस्कृत ही माझीच.
कधी कधी तर वाटते शिकावी बंगाली रवींद्रनाथ काळातील, शिकावी तमिळ, तेलगू, कर्नाटकी
ज्याने दाक्षिणात्य संस्कृती ही कळेल.
तात्पर्य एवढेच की भाषा भिंती तोडायला असाव्या बांधायला नाही. भाषेचे वाडे संस्कृतीचे जतन आणि
आदान प्रदान करायला असावे, संकुचित वाडेबंदी करायला नाही.
प्रत्येक भाषेला ममतेने म्हणूया तु माझी माऊली.
सौ रूपाली साठे
🙏🏻🙏🏻📖📚📙🙏🏻🙏🏻
