माझं घर

सन २००० मध्ये जालगांवमधील श्रीरामनगर (दापोली) या भागात तयार झालेलं माझं हे घर, आज २० वर्षं होऊनही दिमाखात उभं आहे. हो ! दिमाखातच म्हणतो आहे. तो इतरांसाठी राजवाडा नसला तरी आमच्यासाठी नक्कीच आहे. ज्यांचं स्वतःचं घर नाहीये, त्यांच्यासाठी त्यांची भाड्याने घेतलेली खोली किंवा माळावर असलेली चंद्रमौळी झोपडी हाच राजवाडा किंवा बंगला असतो. तसा हाही आमचा बंगलाच.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझं हे घर, हे कोकणात आहे आणि कोकण म्हणजे जणू स्वर्गच अशी उपमा लाभलेला प्रदेश. १२ कि.मी. वर असणारा समुद्र किनारा आणि तिथून मग अथांग सागराची सुरुवात. आंबा, काजू, करवंद, तोरणं, नारळ अशा विविध चवींनी भरलेला हा प्रदेश. स्वतःला नशीबवान, भाग्यवान समजण्याची कोकणातल्या प्रत्येक माणसाकडे अनेक कारणं आहेत. मीही त्यातलाच एक.

घर – समोरून

माझ्या घराची ओळख करून द्यायची झाली तर ती अशी आहे. –
घरासभोवताली जवळपास ४० ते ४५ प्रकारची निरनिराळी झाडे वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यात आहेत. काही रोपं, तर काही पूर्ण वाढलेली आणि दरवर्षी फळं देणारी. घराच्या दाराजवळ विहीर. फक्त १५ ते २० फुटांवर नितळ कातळातून लागलेल्या झऱ्याचं गोड आणि थंड पाणी. आता पाणी उपसण्यासाठी पंप आहे पण आधी रहाटानेच पाणी काढलं जायचं. आतासुद्धा रोज रात्रीच्या जेवणासाठी सगळे एकत्र बसतात तेव्हा रहाटानेच काढलेलं विहिरीचं पाणी वापरतो आणि ते माठात ठेवलेल्या पाण्यापेक्षाही थंड असतं. जेवणाने पोट भरतं आणि पाण्याने आत्मा तृप्त होतो.

विहीर, रहाट आणि बादली

आता घराला चिऱ्याची भक्कम तटबंदी आहे पण आधी फक्त झुडुपांचं कुंपण होतं. आजही ते गावातल्या काही घरांना पाहायला मिळतं. तेव्हाच्या त्या कुंपणाला ग्लोरोसिरीया / ग्लिरिसीडिया (खताचं झाड) नावाच्या झाडाचं व इतर निरनिराळ्या झुडुपांचं मिश्रण होतं. त्यातच फुलांची झाडंसुद्धा होती. पिवळी कण्हेरी, जास्वंद, तगर, अनंत ही गच्च भरलेली झाडं होती. सकाळी लवकर उठून याच फुलझाडांवरची फुलं देवाला अर्पण केली जायची. त्या ग्लोरोसिरीया नावाच्या झाडाच्या पाल्याचा उपयोग मच्छरांना पळवण्यासाठी केलेल्या धुरीमध्ये वापरला जायचा. तेव्हाचं तेच mosquito repellent असायचं. पण गुरं-ढोरं येऊन ती झाडं खायची आणि नुसतंच ते नाही तर त्या झुडुपांमधून आत येऊन आतली झाडंसुद्धा खायची. तसंच दर एका ठराविक वेळेनंतर त्या झुडुपांची छाटणी करायला लागायची. घरातली मोठी माणसं जोवर चालती होती, तोवर त्यांनी आम्हां लहानांना सोबत घेऊन ते केलं. पण हळूहळू ते कमी होत गेलं आणि घराचं आतील नूतनीकरण करणाऱ्या काकांकडूनच कातीव जांभ्या दगडाच्या चिऱ्यांचा बांध घातला गेला. आज त्या बांधावर एक छान वेल वाढली आहे. त्या वेलीमुळे लाल रंगाचा तो बांध हिरवाच दिसतो.

हिरवा झालेला बांध

अजून एक आठवण म्हणजे अंगण. बाकीचं सुधारलं गेलं त्यात अंगणही आलंच. आधी आम्ही दरवर्षीच्या दिवाळीत नवीन अंगण करायचो. मातीचं अंगण खोदायचं, टिकाव घेऊन. मग त्याचं व्यवस्थित सपाटीकरण करायचं, पाणी टाकायचं आणि ते अजून सपाट पण घट्ट करण्यासाठी चोपण्याने चोपायचं. दिवाळीच्या सुट्टीत आई, दादा आणि मी हेच काम करायचो सकाळसकाळ. अंगण झालं की मग ते वेळोवेळी शेणाने सारवणं आलंच. मग त्यासाठी आम्ही एकतर जवळपासच्या जंगलात जाऊन शेण मिळतंय का पाहायचो किंवा जवळच्या दुसऱ्या वाडीत जाऊन गुरांच्या वाड्यातून घमेलातून शेण भरून आणायचो. मग ते शेण बादलीत पाणी घेऊन त्यात कालवायचो. आई केरसुणीने ते सारवायला लागली की लागेल तिथे ते जाऊन ओतायचं. असं हे मस्त केलेलं अंगण दरवर्षी पाऊस आपलं खेळणं समजून लहान मुलासारखं ते इतस्ततः विस्कटून टाकायचा. आम्ही पुढच्या दिवाळीत पुन्हा अंगण करायचो. प्रयत्न करावेच लागतात आणि प्रारब्ध किंवा निसर्गचक्र आहे त्याला स्वीकारावंच लागतं, हा इथूनच मिळालेला एक धडा.

आताचं अंगण

बोलता बोलता केरसुणी हा शब्द आला. गावाकडे त्याला हिराची झाडू म्हणतात आणि या झाडूमधली एक काडी म्हणजे हिरकुट. तर या झाडूसुद्धा आम्ही स्वतःच तयार करायचो. नारळाची थोडी कोवळी, थोडी जून (पिकलेली) झावळी काढून त्याची पानं काढायची आणि मग ते हिर म्हणजे त्या पानांचा कणा, तो तासायचा नीट. व्यवस्थित तासून झाला की वेगळा ठेवून द्यायचा. असा एक चांगला गठ्ठा तयार झाला की तो बांधायचा आणि उन्हात सुकवून मग त्याची झाडू बांधायची. जी पानं काढून बाजूला पडतात तीच मग चुलीला लावायची जळणासाठी. आजही घरी अशा झाडवा बांधून ठेवल्या आहेत (एक झाडू, अनेक झाडवा). हे काम करताना सगळे एकत्र बसलेले असतात. सुटीच्या दिवशी किंवा रिकाम्या वेळेतले हे काम. त्यामुळे गप्पाटप्पांना नुसता ऊत. मग त्यामध्ये ते हिर तासताना बोट सुद्धा कापलं तरी जास्त काही वाटायचं नाही.

न तासलेले हीर आणि केरसुणी

आता चुलीची सुद्धा आठवण झालीच आहे तर तेही सांगतो. थोड्या वर्षांनी, गरजेनुसार आणि जसं जमेल तसं घराचं नूतनीकरण करायचा प्रयत्न केला आहे आम्ही. सगळेच करतात म्हणा. तर, मागच्या बाजूस जी पडवी होती, एकसलग पट्टा असलेली, तिच्या पूर्वेच्या एका कोपऱ्यात चूल होती. तिथेच आधी पाणी तापवायचो अंघोळीसाठी आणि आई आणि मावशी मिळून भाकऱ्यासुद्धा तिथेच भाजायच्या. थंडीच्या वेळी सकाळी उठलो की चुलीजवळ पहिला थांबा असायचा शेक घेण्यासाठी. तिथून ओरडा खाऊन मग निघायचो, तयारी करायला शाळेत जायची. चूल थोडी फुटली तर तिला थोडी डागडुजी केली जायची मातीचं लिंपण लावून. दुरुस्त करण्याबाहेर गेली असेल तर मात्र जुनी काढून नवीनच आणावी लागायची. चुलीवरची भाकरी अर्धी तव्यावर, अर्धी निखाऱ्यांवर भाजलेली आणि सोबत चुलीवरचीच भाजी पण असेल तर मग बातच न्यारी. आता तीन दिवसांपूर्वीच दादाने नवीन चूल आणली पण ती मातीची नाहीये, काँक्रिटची आहे. तसं त्याचा आता काही फरक नाही पडणार कारण चुलीची जागा आता पडवीबाहेर आहे आणि तेही फक्त पाणचूल म्हणूनच. भाकऱ्या आता गॅस शेगडीवर भाजल्या जातात. काळानुसार आणि परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं  याचं हे उदाहरण.

आमच्या घराची पुढची पडवी दोन्ही बाजुंनी फक्त कमरेएवढी कठडा असलेली, बाकी पूर्ण हवेशीर. तिथे दुपारी बसायला खूप छान वाटायचं. घराभोवती पकडापकडी, लपाछपी खेळताना या कठडा असलेल्या पडव्यांचा पुरेपूर वापर व्हायचा. अजून एक खास गोष्ट म्हणजे एका कठड्यावर बसून सूर्योदय आणि दुसऱ्या कठड्यावर बसून सूर्यास्त पाहता यायचा. पण पावसाळ्यात मात्र या हवेशीर पडव्यांचा तोटा दिसून यायचा. पाऊसच तसा यायचा, खोडकर लहान मुलासारखा. कधी या बाजूने जोरात झड मारणार तर कधी त्या बाजूने. पश्चिमेकडच्या बाजूला तर खूपच जोराने यायचा आणि वेडा वारासुद्धा त्याला साथ द्यायचा. दरवर्षी आम्हाला पडवीच्या तेवढ्या मोकळ्या आकाराची म्हणजे जवळपास ६-७ फूट उंच आणि ५-६ फूट रुंद अशी ताडपत्री खिळे ठोकून लावावी लागायची. फक्त तिथेच नाही तर बाकीच्या खिडक्यांना आणि दरवाज्याला (पश्चिमेकडच्या) सुद्धा. बांधलेली ताडपत्री कधीकधी बाजूने सुटायची पण. आणि मग पडवी भिजायची पावसाच्या सड्याने. मग अशावेळी भर पावसात बाहेर जाऊन खिळे मारून ती नीट करावी लागे. छत्री असायची पण भिंतीत खिळे मारून बसवलेली ताडपत्री निघते, तिथे आपली काय बिशाद ! दरवर्षी एवढं करणं शक्य नसल्यामुळे एका वर्षी ती मोकळी जागा, भिंत म्हणून तयार केली गेली.

घराच्या परिसरातच नव्हे तर आजूबाजूला पण खूप सारी झाडं असल्यामुळे इथला वारा मस्त घुमून वाहायचा. जोरजोरात. चिकू, जास्वंद अशा झाडांवर बुलबुल नावाच्या पक्षांची बरीच घरटी असायची. या अवखळ वाऱ्याने ती पडायची खाली बरेचदा. बुलबूलच नव्हे तर सकाळसकाळी जंगलामध्ये झाडावर टकटक करणारा सुतारपक्षी, मासे पकडणारा खंड्या, दुभंगलेली शेपटी असलेला कोतवाल, छोट्या छोट्या चिमण्या आणि इतर पक्षी, घारी आणि हो, पपईची चोरी करणारा ककणेर ( Great hornbill ) हे सुद्धा असायचे. घराच्या वायव्येला बरीच वर्षं आधी पपईची दोन मोट्ठी आणि उंच झाडं होती. त्यावर खूप सारे पपई यायचे आणि त्यांची चवही खूप गोड असायची. त्यावर नेहमी २-३ ककणेर येऊन बसलेले असायचे आणि आपलाच अधिकार असल्यागत ते पिकलेले पपई फस्त करायचे. फयान वादळात पपईची झाडं गेली त्यानंतर तेही जवळपास गायबच झाले. आता खूप दुर्मिळवेळा दिसतात पक्षी. परवाच आम्हाला एक भारद्वाज पक्षी कुंपणाच्या बांधावरून उड्या मारत जाताना दिसला. लहान असताना ते चतुर (DragonFly) असायचे ना, त्यांना पकडायचा पण आमचा खेळ असायचा. त्यांना पकडण्यासाठी आता पश्चिमेला जे घर आहे त्याच्या आधीच्या मोकळ्या जागेत अख्खा दिवस घालवायचो. त्यांना पकडायचं आणि शेपटीला दोरा बांधून त्यांना पाळीव प्राण्यांसारखं वागवायचो. समज आल्यापासून ते सगळं बंद केलं पण आमच्यासाठी तेव्हाची तीच Remote Control वरची विमानं. नंतर कुणीतरी अफवा पसरवली होती की माणसांचा त्यांना स्पर्श झाला आणि ते त्यांच्या कळपात गेले तर इतरजण त्यांना मारून टाकतात. ते किती खरं आणि किती खोटं हे माहित नाही पण आपल्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्या जीवाला त्रास देऊ नये ही शिकवण रुजली मनात.

पश्चिम बाजूची झाडे

पूर्व बाजूची झाडे

हे आणि अजून खूप काही आहे तुम्हां सगळ्यांसोबत वाटण्यासाठी. पण मला सर्वात जास्त काय आवडतं माझ्या घराबद्दल तर माझं एकत्र कुटुंब, त्या कुटुंबातली माणसं. ८-९ जणांसोबत राहताना या घराचं भरलेपण आणि भारलेपण जाणवून येतं. घरात काही सोहळा असला की घर माणसांनी भरतं, सोहळा संपला की माणसं परत जातात पण तरीही माझं हे घर भरलेलंच असतं.

घरातल्या माणसांची थोडक्यात ओळख अशी –
आई आणि मावशी घराचा पाया. दादा आणि पप्पा त्या घराचं छत. ( काकांना स्वर्गवास झाल्यापासून ती जागा दादाने घेतली) . बहिणीसारखी माया लावणाऱ्या वहिनी, लग्न होऊन सासरचं माहेरसारखंच नंदनवन करणाऱ्या २ लाडक्या बहिणी, महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपलं ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेली छोटी लाडकी बहीण, आणि सगळ्यांत जास्त लाडकं आमचं छोटं बाळ, दादा-वहिनीचं पिल्लू, आऊ-माऊ सारखे बोबडे बोल बोलून मी गात असलेल्या बालगीतांची नक्कल करणारी माझी पुतणी.

यासर्वांसोबत असलो तर आयुष्यातले आत्यंतिक सुखाचे क्षण.. आणि जरी लांब असलो तरीही या घराचा, कुटुंबाचा आणि कोकणाचा एक अविभाज्य सदस्य असल्याने त्यांच्या कायम जवळ असल्याचीच भावना मनाला लाभते.
त्यामुळेच मी सुद्धा म्हणतो, येवा ! कोकण आपलाच असा !!!

– प्रथमेश सागवेकर

छायाचित्रे – शामल सागवेकर
विडिओ Dilip Satam

(लेखक हे आपल्या वाचकमित्रांपैकी एक आहेत.)
टीप – लेख व छायाचित्रांचे सर्व हक्क लेखकांकडे आहेत.

शब्दार्थ

चोपणे – जमीन सपाट करण्यासाठीचे लाकडाचे एक साधन

गुरांचा वाडा – जिथे गुरांना दावणीला बांधतात. (शक्यतो पावसाळ्यात. इतर वेळी बाहेरच )

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top