नमस्कार मित्रहो आणि मैत्रिणींनो,
आताच सिंहगड ट्रेकिंग करून आलो आणि मला त्यातल्या गंमतीजंमती टिपून ठेवायच्यात. त्याच तुमच्यासोबत सुद्धा share करणारे. आता अंघोळीसाठी पाणी गरम होईपर्यंत लिहितो म्हणजे विसरणार नाही. कारण या आधीची बरीच प्रवासवर्णनं नंतर लिहेन या कारणामुळे काळाच्या ओघात मेंदूतून नष्ट झाली.
सुरुवात –
तर काल रात्री उशीरपर्यंत ऑफिसचं काम चालू होतं. त्यामुळे झोपायला साहजिकच उशीर झाला आणि त्यामुळे उठायलाही. इतरवेळीचा कार्यक्रम वेगळा असतो, पण आज ५:४० ला उठलो. प्रातःविधी आटपून ६ ला निघालो घरून. माझ्या घरापासून सिंहगड पायथा जवळपास ३० किलोमीटर आहे. त्यामुळे जायला ४५ मिनिटे तरी लागतातच. ६:४५ ला बरोबर पोहोचलो. गाडी व्यवस्थित लावली. हेल्मेट असंच अडकवावं लागलं आज, कारण रात्री त्याचं Wire लॉक शोधायला अर्धा तास गेला. मित्राने शोधून तर दिलं पण नेमका त्याच्यासोबत जो कागद असतो ज्यावर पासवर्ड असतो तोच गायब होता. मग थोडा प्रयत्न केला उघडण्याचा. पण ४ अंकी लॉक, ९९९९ कॉम्बिनेशन्स मला Try करायला लागली असती तेव्हा कुठे मिळालं असतं. मग असंच देवाच्या भरवश्यावर ठेवलं आरशाला अडकवून.
बरोबर ६:५० ला चढायला सुरुवात केली. मधला एक शनिवार जाता न आल्यामुळे खंड पडला होता. त्यामुळे थोडं दमायला झालं सुरुवातीला. पण एका दमात तरी खूप अंतर चढलो मी. मग मध्येच थांबलो आणि हृदयाची वाढलेली धडधड शांत केली, वाढलेला श्वासाचा वेग नॉर्मल केला आणि मग पुढे चालू लागलो. आज मला खूप वेळ लागणार असं वाटत होतं कारण पहाटेच्या अंधारात वरती किती दूर आहे दरवाजा हे दिसत नसतं, फक्त Tower ची light दिसत असते. आजूबाजूला मिट्ट काळोख, पायाखाली विजेरीचा उजेड, कानात भरलेला रातकिड्यांचा गुंजारव आणि गड सर करण्याचा अट्टाहास याने पटपट चढण्यास मदत होते. इतर काही दिसत नसतं ना यावेळी. ते घोड्याच्या डोळ्यांना बांधलेलं असतं ना तसं, त्याने त्याला फक्त समोर बघता येतं आणि त्याचा धावण्याचा वेग वाढतो अस म्हणतात, तसं. (रात्री आजूबाजूला मला वेगवेगळ्या सावल्या आकार दिसतात, भयकथा ऐकल्यामुळे, म्हणून पण पटापट पुढे जातो मी.. 😀 . आणि दिवसा निसर्ग सौंदर्य दिसतं त्यामुळे थांबून फोटो घ्यावासा वाटतोच आणि मग तिथे वेळ जातो.)
वर जाताना खाली उतरणारी माणसं चढणाऱ्यांचा जोश वाढवत असतात. कुणी म्हणतं राम कृष्ण हरी, कुणी ओम शांती, तर कुणी जय शिवराय. पण हे एक दोनदा किंवा जुनी ओळख असणाऱ्यांनाच. सगळ्यांना नाही. पण तरीही इतरांनाही ते ऐकून जरा उस्फुर्त वाटतं. पहाटेच्या वेळी गर्दीही कमी असते त्यामुळे ते एक अजून कारण लवकर वरती पोहोचण्याचं. ७ वाजून गेले की मग गर्दी वाढत जाते. मग कुणी हळूहळू चढत असेल तर त्यांच्या मागून काही अंतर चालावे लागते चिंचोळी वाट असेल तर, किंवा खाली येणारे खूप संख्येने असले तर.
जातायेताना मागच्या पुढच्या लोकांचे काही संवाद कानावर पडतात ते ऐकून हसायला येतं तर कधी कुणाला चिअर-अप करावं वाटतं, पण चढताना बोलायचं नाही या अटीवर कायम राहून मी पुढे होतो. काहीजण दमतात, मग त्यांच्यासोबतचे एकतर थांब म्हणतात, पुढे चालण्यासाठी उद्युक्त करतात, किंवा ओरडतात खोटे खोटे. काहीजण एकदम तयार होऊन आलेले असतात, प्रोफेशनल ट्रेकर बनून तर काहीजण अगदी फॉर्मल शूज घालून सुद्धा येतात. कसे चढतात आणि त्यांचे व त्यांच्या बुटांचे काय हाल होत असतील देवच जाणे. एक काकू/ताई आज साडी घातलेल्या दिसल्या, कपड्यांबद्दल काही विरोध किंवा हट्ट नाही, पण वाट थोडी निसरडी, धोकादायक, कधी सरळ तर कधी दगडातून जाणारी आहे म्हणून काळजी वाटते इतकंच. पण ट्रेक ला जाताना योग्य तयारी, पोशाख आणि मार्गदर्शन हवंच, किमान माहिती तरी, जिथे जातोय त्याबद्दल. तुमच्या गटातल्या माहितगार माणसाचे मार्गदर्शन असेलच तुम्हाला. ते नाही सांगत.
छोटी मुलेही येतात याचं कौतुक वाटतं. दमतात पण चढतात.
प्रत्येकाचं गड चढण्याचं कारण वेगळं.
- कुणी येतो मोठ्या ट्रेकची पूर्वतयारी करायला. असे लोक व्यवस्थित तयार होऊन पाठीवर १०, १५, २० किलोचे वजन घेऊन गड चढतात. अप्रूप आणि कौतुक यांचंही.
- पुढचे असतात जे बाहेरून पुण्यात आलेले असतात आणि फिरायला, पर्यटनाला गडावर येतात. अशा लोकांना दीड ते २ तास लागतातच चढायला, जर आधी गड चढण्याची सवय नसेल तर. बिचारे दमतात, मध्ये मध्ये बसतात, पाणी वगैरे पिऊन पुढं वाटचाल करतात.
- आणि पुढचे म्हणजे दर आठवड्याला सिंहगड चढणारे. आठवडाभराचा व्यायाम होतो, घाम बाहेर येतो, श्वास मोकळा होऊन फुफ्फुसांचे कार्य चांगले होते, आणि अजून बरंच काही, जे व्यायामशाळेत trade mill वर चालण्याने, धावण्याने होते वा सकाळ संध्याकाळच्या चालण्याच्या फेरीने.
वर पोहोचायला आज मला १ तास लागला. वर पोहोचल्यावर मग सिंहगड गावातील लोकं दुकान थाटून बसलेली असतात. लिंबू सरबत, मटका ताक, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मीठ मसाला लावलेला गोड पेरू, बोरं, काकड्या, पाणी आणि अजून बरंच काहीकाही. हे सगळं आम्ही नुसतं पाहत असतो आणि मग आमच्याकडच्या बाटलीतलं साधं किंवा ग्लुकोज पाणी पितो, नेहमी. १० मिनिटं बसलो. बरेचसे फोटो काढले. वरून पुणे शहर, खडकवासला धरण, सिंहगड गाव – सगळं अगदी हिरवं हिरवं पाहायला छान वाटतं. १० मिनिटांनी म्हणजे बरोबर ८ ला खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरतानाही काळजी घ्यावी लागते. जास्त हळू किंवा वेगात नाही जाऊन जमत. पाय लचकण्याचा, मुरगळण्याचा किंवा घसरण्याचा संभव असतो. तसंच काही जण मध्येच बसलेले असतात अशावेळी सावकाश वाट पाहून उतरावं लागतं. तर असं उतरण्यासाठी मला ४० मिनिटे लागली. ५ मिनिटात निघून ९:३५ ला घरी पोहोचलो सुद्धा.
तर मंडळी कसं वाटलं हे प्रवास वर्णन नक्की कळवा.
पुन्हा भेटू पुढच्या प्रवास वर्णनाच्या प्रपंचात.
सोबतीला काही फोटो जोडत आहे. नक्की पाहा. Google Drive Link