राजगड – गिर्यारोहणाचं प्रवासवर्णन

वेळ सकाळी ९:४५. पावसाची रिपरिप आणि मध्येच सडकून लागणारी सर. तांबड्या मातीतून चिखलातून घसरत घसरत झालेली सुरुवात. काही ओळखीचे मित्र असते तर इथूनच परत गेले असते, त्यामुळे त्यांना आणलंच नाही ते बरं झालं, अशी भावना. पहिल्या थांब्यानंतर चोरदरवाजाजवळ एकच माणूस जाईल अशा अवघड आणि उभ्या सरळसोट वाटेवर झालेली कोंडी आणि गिर्यारोहकांच्या त्याबद्दल निघणाऱ्या संमिश्र भावना. महाराष्ट्राच्या दैवताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूच्या दुर्दशेचे दृष्य. शिवकालीन वास्तुरचना आणि त्यावेळचे अनाकलनीय असे प्रचंड कष्ट, जिद्द, पराक्रम.
हे आहे, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडला दिलेली भेट, आमच्या गिर्यारोहणाचं प्रवास वर्णन.
सकाळी ६ वाजता निघता निघता आम्ही ६:३० लाच उठलो आणि घरून निघेपर्यंत ७:३० वाजले. कात्रज चौकात १५ मिनिटांत पोहोचलो आणि ५ च मिनिटांत सूर्या त्याची चारचाकी घेऊन आला. आधी मंडळी बरीच असल्याने सर्वांनी दुचाकीने जायची योजना होती पण मंडळींनी हळूहळू पाय काढायला सुरुवात केली आणि त्यामुळे कात्रज चौकातल्या एका Pay & Park Area मध्ये राज आणि माझी गाडी लावून आम्ही चारचाकीनेच पुढे प्रयाण केले. सोबत राजची मैत्रीण शामली होती, असे आम्ही ५ जण गाडीत होतो. पिंपरी चिंचवडवरून येणारे पाटील आणि कॅप्टन असे दोघेजण आणि अजून दोघेजण दुचाकीवरून येणार होते.
ते आधीच पुढे थांबलेत असे सांगितल्यामुळे आम्ही निघालो. नसरापूर जवळून उजवीकडे वळून आम्ही वेल्ह्याच्या रस्त्याला लागलो. ते पुढे थांबलेत असं सांगितल्यामुळे आम्ही त्यांना पाहत पाहत निघालो होतो. पण ते अगदी बनेश्वरच्या पुढे असणाऱ्या आमच्या राजतोरण मिसळच्या थांब्यापर्यंत सुद्धा दिसले नाहीत. त्यांना पाहण्याच्या नादात पुढे दिसणाऱ्या प्रत्येक दुचाकीवर त्यांना शोधत होतो. पण अगदी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ते काही दिसले नाहीत. नंतर कळालं की ते आधीच पुढे गेले आहेत.
तर आम्ही राजतोरण मिसळ या उपहारगृहात न्याहारी केली. चव छान होती मिसळीची. मिसळ संपता संपताच पाटील आणि कॅप्टन यांचं आगमन झालं. निदान एक जोडी तरी सापडली म्हणून हायसं वाटलं जरा. त्यांच्यासोबत मग चहा झाला तर काहींनी सोलकढी घेतली. न्याहारी झाल्यावर मग आम्ही निघालो ते थेट मार्गासणीच्या फाट्याला थांबलो. तिथे त्यांना फोन केला तर ते पुढे लागणारं साखर गाव ओलांडून पुढे गेले होते. आम्हीही मग लगेचच निघालो आणि अगदी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. जवळपास ९:३५ झाले होते. गाडी पार्किंगच्या जागेत लावून त्या दोन मित्रांना संपर्क साधण्याचा निष्फळ प्रयत्न करून आम्ही ९:४५ च्या सुमारास किल्ला चढायला सुरुवात केली.
पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ता निसरडा असेल याची कल्पना होती पण तांबड्या मातीचा चिखल लागेल याची नव्हती. कोकणात मामाच्या गावाला गणपती विसर्जनाला अशाच तांबडातून (तांबड्या मातीच्या रस्त्याने, जो पावसात खूपच निसरडा होतो) नदीकिनाऱ्यावर जायचो, त्यामुळे ती सवय होतीच. आणि तसंही मी Sparx च्या सॅन्डल घातल्या असल्यामुळे मला तो तेवढा पट्टा चढणे अवघड नाही गेले. बाकीचे सदस्य सुद्धा कसेबसे वरती आले कारण बाकी सर्वांनी बूट घातले होते आणि ते ट्रेकिंगचे नव्हते. त्यामुळे ते खूपच घसरत होते. पाटलांची लय बेकार अवस्था झाली. आम्ही ज्यांना पुण्याचे bear Grylls समजत होतो ते बाजूच्या झुडुपाला धरून वर येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच प्रयत्नात जागच्या जागेवर धावत होते. शेवटी तेही कसेबसे वर येऊ शकले. त्यानंतर सुद्धा काही वेळ तसाच पट्टा होता, मग मात्र कातळ टाकून केलेला रस्ता लागला ज्याला आम्ही कोकणात गोवंड/गवंड बोलतो. (उदा. गवंडातनं चाललास काय रे बा??)
हा रस्ता लागताच तिथं एक आजीबाई उभ्या होत्या ज्यांच्याकडे बऱ्याच बांबूच्या काठ्या होत्या, ज्या ट्रेकर्सना त्या विकत होत्या, १०-१० रुपयांना. या काठ्या टेकत गेल्याने त्या काठीवर भार देता येतो शरीराचा आणि दम कमी लागतो. तसेच आधारही मिळतो. पोरांनी चांगल्या आहेत का काठ्या? असं म्हणत त्यातून चांगल्या काठ्या शोधायला सुरुवात करताच म्हातारीने आपली व्यथांची कथा सुनवायला सुरुवात केली. “सगळ्याच काठ्या चांगल्या हायेत रं. राहायला घर नाही, शेत न्हाय, म्हणून आपली काहीतरी सोय कराय लागतीया. “ कॅप्टन त्यांना समजावून सांगू लागले की हरायचं नाय, रडायचं नाय आजी, जगायचं बिनधास्त. त्या म्हाताऱ्या आजीबायला त्या शब्दांचं काय वाटलं असेल माहित नाही, पण पोरं अशी धीराचे २ शब्द बोलतायत हे बघून बरं वाटलं.
चालून चालून पोरं दमत होती. कॅप्टन आणि पाटील यांच्यासोबत राज मागेच थांबला होता म्हणून आम्ही उरलेले वरती तसेच थांबून होतो आणि मग करणार काय म्हणून फोटो काढायला सुरुवात झाली आमची. या pose मध्ये फोटो काढ माझा किंवा इथे बसून काढ किंवा मागून काढ. एक ना अनेक तऱ्हा. शेवटी ते आले वरती आणि मग त्यांच्यासोबतसुद्धा ते सत्र सुरु झालं. पण उशीर होईल वर पोहोचायला म्हणून मग निघालो.
तर मग आम्ही एका पठारावर आलो जिथून निसर्ग सौंदर्य ओथंबून वाहत होतं. डाव्या बाजूला असणारी खोल दरी, त्यापलीकडे असलेला डोंगर आणि त्याचं डोकं लपवून वाहणारी धुक्याची चादर. उजव्या बाजूला सुद्धा सरळ असली तरी खूप उंचीची दरीच होती आणि मग त्यापलीकडे दिसणारी लांबवर पसरलेली शेतं. त्या शेतांवरच सूर्य नारायणाने आपली कृपा बरसवली होती. इथे वरती नुसते काळे ढगच ढग होते. तर या सौंदर्यासोबतच्या आठवणी जपण्याचा मोह आवरला नाही आणि इथे सुद्धा फोटोग्राफी सुरु झाली. जवळपास १५-२० मिनिटे ती चालली. पुन्हा एकदा उशीर होईल याची जाणीव झाल्यावर हळूहळू आम्ही वर जाऊ लागलो.
आता त्या पठारावरून, पावसाळ्यात सिंहगडाची पायवाट जशी दिसते, अगदी तशीच पायवाट दिसत होती. त्या पायवाटेने एका भगव्या झेंड्याजवळ आम्ही आलो. तो दुसरा थांबा असेल असे वाटले पण अजून तो खूप लांब होता. थोडं चालून गेल्यावर सखल पायवाट लागली. अजून थोडं पुढे आलो आणि पाण्याचा नैसर्गिक स्रोत, एक छोटासा धबधबा लागला. तिथे पाणी भरून घेत होतो. पाणी बाटलीमध्ये भरण्यासाठी धार जिथून खाली पडते तिथे हात वर नेला आणि एक धार सरळ माझ्या बाहीतुन माझ्या सदऱ्यात घुसली. थंड पाण्याची ती धार अंगात थंड आणि बारीक शिरशिरी उठवून गेली. त्याचं एवढं काही वाटलं नाही कारण येताना बऱ्यापैकी पावसात भिजणं झालं होतं. तसाच उभा राहून एक बाटली पूर्ण पाणी भरलं आणि सोबत्यांची पुन्हा एकदा फोटोग्राफी सुरु झाली. दुसरे गिर्यारोहक येऊन त्यांना पाणी भरण्यासाठी जागा द्यावी लागली तेव्हा ती थांबली.
पुढे आलो आणि मग ट्रेकिंगचा खरा अनुभव कसा असतो हे दिसू लागलं. समोर अरुंद अशी पायवाट, एका बाजूला दरी तर एका बाजूला उन्नत असा दुर्गराज. एका वेळी एकच जण जाऊ शकेल किंवा जास्तीत जास्त दोघेजण विरुद्ध दिशेनं ती पार करू शकतील अशी चिंचोळी वाट. यायला थोडा उशीर झालेला आणि आज त्यात रविवार. तुफान गर्दी होती किल्ल्यावर आणि नेमकी त्यातली बरीच गर्दी या अरुंद वाटेवर अडकली होती. लहानपणी छान छान गोष्टी या पुस्तकातली ती बकऱ्यांची गोष्ट नाही का, अगदी तशीच परिस्थिती ओढवली होती. माझा  राजगडचा हा पहिलाच ट्रेक असल्याने मला कदाचित वाटलं असावं. वरचे लोक खाली उतरताना खूप वेळ घेत होते त्यामुळे खालून येणाऱ्यांची गर्दी वाटेवर जमत होती. वरून येताना एका ठिकाणी अगदी उभी चढण होती आणि ती त्यांच्यासाठी आता उतरण होती जी खूप कठीण होती. पुरुष बायका सर्वजण बसूनच खाली येत होते. त्यामुळे खालची माणसं वाढू लागली आणि कालवा होऊ लागला, ओरडओरड होऊ लागली. मग थोडी माणसं वरच थांबवून आधी खालची माणसं वर चढू लागली. त्यात माझ्यासोबतचे तिघेजण वरती गेले आणि मी जाईपर्यंत पुन्हा वरची लोकं खाली उतरू लागली. जवळपास अर्धा ते पाऊण तास तिथेच खर्ची गेला. मग मी सुद्धा वेळेचा सदुपयोग करून काही चित्रं टिपली. आणि मग आमचा टर्न येऊन आम्ही  चोरदरवाजाजवळ पोहोचलो.
चोरदरवाजातून वर येताच पद्मावती तळं लागलं. तिथे आमची मंडळी बसली होती. तिथे पुन्हा छायाचित्रण झालं, थोडा सुका खाऊ खाऊन झाला आणि मग पुन्हा वरती चढाई सुरु झाली. तिथून वरती महाराणी सईबाईंच्या समाधीजवळ पोहोचलो, तिथे नमन करून पद्मावती मंदिरही पाहिलं आणि रामेश्वराचंही. नेमका त्याचवेळी पाऊस आला आणि मला फोन सुद्धा आला. मी त्या मित्रासोबत बोलत असता माझं लक्ष हटून माझ्यासोबतची मंडळी सरळ वर सदरेकडे गेली असं वाटलं म्हणून वर गेलो. तिथे त्यांना खूप शोधलं पण काही सापडेनात म्हणून फोन केला आणि कळालं की ते अजूनही त्याच मंदिराजवळ पिठलं भाकरी खात आहेत. मी सुद्धा खाली जाऊन त्याचा आस्वाद घेतला सोबत गरम गरम भाजी सुद्धा. नेमका तेव्हाच पाऊस आला, पण त्या पावसातच पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला.
त्यानंतर आम्ही सदरेकडे गेलो, जाताना अंबरखाना लागला. सदरेवर आल्यावर मला काही गिर्यारोहक स्वयंसेवक दिसले जे गडावर असणारं प्लास्टिक, कचरा गोळा करत होते. मी सुद्धा एक पोतं घेऊन आलो होतो, ज्यात त्या छोट्या धबधब्यापासून आम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करत आलो होतो. त्या त्यांच्याकडे जमा केल्या. जेवढ्या हाताला लागल्या तेवढ्या केल्या परंतु अवघड जागी बरंच प्लॅस्टिक साचलं होतं. लोकांना त्याबद्दल सुबुद्धी का होत नाही हेच कळत नाही.
असो. सदरेकडे जाऊन मग पुढे बालेकिल्ल्याकडे प्रयाण केले. त्यात आम्ही काहीजण पुढे गेलो आणि काहीजण मागेच पोहे खायला राहिले. त्यामुळे आमची चुकामुक झाली. पुढेसुद्धा आधी जशी अरुंद वाट होती वर चढण्यासाठी अगदी तशीच, कदाचित त्याहीपेक्षा कठीण अशी वाट लागली आणि तिथे पुन्हा अर्धा पाऊण तास वाट पाहून बालेकिल्ल्याच्या दरवाजाला पोहोचलो. ही वाट अशी अवघड होती की कुण्या एकाचाही तोल गेला की जवळपासचे सर्वजण किंवा किमान ५-६ जण तरी खाली कोसळणार आणि तेही खाली दाट धुक्यामुळे काहीही न दिसणाऱ्या खोल दरीत. त्यामुळे तिथून येताना खूपच धाक तयार झाला होता मनात. फक्त आधीचे गड चढण्याचा अनुभव यामुळे हे निभावून नेलं होतं.
दवाजातून वर गेल्यावर जननी माता मंदिर लागलं. तिथून थोड्या पायऱ्या वर चढून आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे (दुर्दैवाने म्हणावं लागेल असे) भग्न अवशेष पाहायला मिळाले. त्याठिकाणचा जाणता राजा लिहिलेला आणि महाराजांचा फोटो छापलेला ध्वज सुसाट वाऱ्यावर दिमाखात फडकत होता. तिथून थोडं मागील बाजूस गेल्यावर पाण्याची काही टाकी पाहायला मिळाली. अजून थोडं पुढे गेल्यावर खाली जंगलात उतरणारीही एक वाट होती पण ती खूप धोकादायक वाटत असल्याने आणि धुक्यामुळे नीटसं दिसत नसल्याने तिथून आम्ही मागे फिरलो.
येता येता दादाने एका मुलाला सुवेळा माचीबद्दल विचारलं आणि त्याने सांगितलं की बालेकिल्ल्याची जी अवघड वाट आहे ती खाली उतरून गेल्यावर एका झाडाच्या इथून उजवीकडे खाली वळून जावं लागतं. आम्ही बालेकिल्ल्यावरून खाली आल्यावर नेमकेच मागे राहिलेले सदस्य आम्हाला भेटले. त्यांना घेऊन सुवेळा माचीकडे निघालो. त्या मुलाने सांगितलं की १५ मिनिटात जाता येतं तिकडे, पण वाट निसरडी असल्यामुळं एका ठिकाणानंतर फक्त दादा पुढे गेला, त्याला नको जाऊ सांगून सुद्धा आणि आम्ही सगळे मागेच थांबलो होतो. वारा खूप असल्याने जाणे भीतीचे वाटत होते. २-३ मिनिटांनी वारा कमी झाला आणि सूर्या, मी, शामली सुद्धा निघालो. मागाहून राज, कॅप्टन आणि पाटील आले. तिथून खाली उतरल्यावर मात्र बऱ्यापैकी ठीक अशी वाट होती. अजून १५ मिनिटं सावकाश चालल्यावर सुवेळा माचीवर पोहोचलो. तिथे आमच्या ग्रुपचा एक फोटो  काढला, पायऱ्यांवर. त्यानंतर पुन्हा मागे फिरायचं होतं पण खाली अजून एक ठिकाण असल्यामुळे तिकडे मोर्चा वळला आमचा आणि खाली आम्हाला प्रसिद्ध नेढं पाहायला मिळालं. सुवेळा माचीचाच एक सुळका किंवा तुकडा पुढे आला होता ज्यामध्ये एक खूप मोठं भगदाड पडल्यामळे आरपार दिसत होतं आणि अतिशय सुंदर दृश्य तिथून पाहायला मिळत होतं तिथून. आमच्यापैकी फक्त सूर्याच तिथे जाऊन आला. वरती चढताना त्याचं एक खूप छान छायाचित्रंही आलंय.
तो तिथे वर असताना दादा आणि मी अजून थोडं पुढे हस्ती प्रस्तर पाहिलं जिथं आता काहीही नव्हतं. मग तसेच पुढे निघालो आम्ही. माचीच्या शेवटच्या टोकाला जाऊन यायचं असाच निर्धार केला होता आम्ही. काही अंतर पुढे गेलो आणि खंदक पाहायला मिळाला किंवा दुहेरी तटबंदी. थोडं वर चढून गेलो आणि वाटलं हेच शेवटचं टोक पण प्रत्यक्षात मात्र अजून खूप पुढे होतं शेवटचं टोक. पाऊस जोरात पडू लागल्यामुळे आणि आमच्या दोघांचेही चरणकमल दुखू लागल्यामुळे परतीची वाट धरली आम्ही.
सुवेळा माचीला येताना आम्ही कठीण वाट पार करून आलो होतो, परंतु जाताना एकाने दुसरी सोपी वाट सांगितली जी थेट सदरेवर जात होती, जिथून आम्ही बालेकिल्ल्यासाठी वर गेलो होतो. सदरेवर आल्यावर मग आम्ही खालचीच वाट धरली थेट. पद्मावती मंदिराजवळ आल्यावर मात्र गरम गरम भजी खायला पावलं वळली कारण येताना फटकारणाऱ्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर, कानात आणि अंगावर घेऊन आलो होतो. ते झाल्यावर मग पुन्हा चोरदरवाजाने खाली उतरायला सुरुवात केली. आता यावेळी जवळपास ४ वाजत आले होते, त्यामुळे वर येणाऱ्यांची गर्दी संपली होती. खाली उतरून दुसऱ्या थांब्यावर यायला आम्हाला ५ वाजले. तिथे येऊन थोडं थांबलो, आणि पाटील व कॅप्टन मागं राहिल्यामुळे ते येईपर्यंत फोटोग्राफी पुन्हा  सुरुकेली. ते आल्यावर मग त्यांचं सुद्धा सुरु झालं. हे सगळं आवरून, येताना लागलेल्या पहिल्या पठारावर पोहोचायला ५:४७ झाले. यावेळी दादा थेट खाली चालत गेला तर चढतानाच इथे छायाचित्रण करायचं हे ठरवून वर गेलेली पोरं थांबली नसती तरच नवल.
६:०५ पर्यंत हे चालू होतं. आणि मग आम्ही खाली जाण्यासाठी निघालो. एवढा वेळ पाऊस नसल्यामुळे सुकलेले आम्ही, निघाल्यावर २ च मिनिटात पाऊस आला म्हणून परत भिजलो. आता कुठे थांबण्याचीही सोय नव्हती. तसंच खाली यावं लागलं. खाली जाताना मी थोडं पुढे आलो आणि मला मागून सूर्याने हाक मारली असं वाटलं आणि थांबायला सांगितलं. मी पुन्हा धावत वरती गेलो कुणी पडलं की काय तांबडात असं वाटून आणि पाहिलं तर दुसऱ्याच गटाची मुलं त्यांच्या गटातल्या प्रथमेशला हाक मारत होती, जो आडवाटेने चालला होता खाली. मग मी पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. बाकी सर्वजण खूपच काळजी घेऊन चालत होते कारण पुन्हा तांबड चालू झाला होता. मी आरामात खाली उतरत होतो. एक पट्टा पुन्हा असा लागला जिथे खूप सारी लोकं घसरून पडली असावीत असं दिसत होतं, तिथे एक गावातला माणूस उभा राहून खाली येणाऱ्यांना बाजूची झुडुपं पकडून खाली यायला सांगत होता. मी हिंमत करून मधूनच चालायला सुरुवात केली आणि आरामात चालायला लागलो हे पाहून तो गंमतीने मला म्हणाला, “भाऊ, तू तर छावा आहेस”. मी सुद्धा तितक्याच गंमतीने त्याला उत्तर दिलं, “आपल्याकडे sparx च्या sandal आहेत”. आणि मी पूर्ण तांबडातून अजिबात न घसरता खाली उतरलो. खाली वाहनतळाकडे येताना दादा एका मंदिरात थांबलेला दिसला तर मी ही तिथेच गेलो आत मध्ये. पाऊस सुरु होता आणि आता भिजायची इच्छा नव्हती. मी आल्यावर २० मिनिटांनी बाकीची मंडळी पोहोचली.
हातपंपावरची गंमत – मंदिराजवळच एक हातपंप होता, तिथे काहीजण आपले मातीने भरलेले पाय आणि बूट धुवत होते. या सगळ्यात जो हापसा मारत होता त्याची दमछाक होत होती. एकजण झपझप हापसा मारत होता, तो हापसा मारून मारून दमला पण थेंबभर पाणी काही येईना. मग नळाखाली हात धरून बसलेला एक पोरगा म्हणाला अरे घाई नको करू, leverage वापरून पाणी येईल वर हळूहळू मार हापसा जोर लावून, आणि खरंच त्या तंत्राने पाणी आलं वर. आम्ही तिथे उभे राहून त्यांची जायची वाट पाहत होतो पण वरून येणारी मंडळी वाढतच जात होती. मीही त्या आधी एकदा हापसा मारून झालो होतो पण जमलं नव्हतं. पण आता मला तंत्र गवसलं होतं. दादा आणि शामली ला म्हटलं पाय धुवायचेत का? हो म्हणाले म्हणून मी तसाच हापसा मारला आणि यावेळी मात्र पाणी आलं. गर्दी पण कमी होती. एवढा वेळ इथे आम्ही उभं राहून हे सगळं करेपर्यंत सूर्या आणि राज ने वाहनतळाजवळच्या हातपंपावर जाऊन, हातपाय धुवून कपडे सुद्धा बदलले आणि आम्ही तसेच ओल्या कपड्यात कुडकुडत होतो.
गंमतीचे अजून काही किस्से –
१. लॉगिन – आमच्याबरोबर आलेली शामली एका नामांकित कंपनीत कामाला आहे. शुक्रवारचं थोडं काम राहिलं होतं आणि ती ते रविवारी पूर्ण करणार होती म्हणजे आज. आणि आज तिच्या मित्राच्या आग्रहाखातर ती आमच्यासोबत आली होती. त्यामुळे आल्यापासूनच तिची लवकर चला, लवकर चला, लॉगिन करायचंय, लॉगिन करायचंय अशी जपमाळ सुरु होती. ही जपमाळ फक्त छायाचित्रण सुरु झालं की काही वेळासाठी विसावा घ्यायची आणि पुन्हा सुरु. म्हणून तिला मी लॉगिन असंच नाव ठेवून दिलं. तिला मी असंही म्हणालो की तो ई-मेल करून दे आज सुट्टी घेतेय याचा. तर म्हणाली की रात्री उशिरा करेन लॉगिन, पण करेन. कामाप्रती आणि दिलेल्या शब्दाप्रती निष्ठा हवी ती अशी.
२. पनवेलवाले – चोरदरवाजाजवळ जी कोंडी झाली होती तिथे आमचे दादाशेठ एकच वाक्य पुनःपुन्हा उच्चारत होते. “अरे जल्दी आओ भाई, कल सुबह पनवेल को निकलना है” तिथली मंडळी सुद्धा दादाला हसत होती पण नंतर तोच त्याचा ब्रँड झाला. त्या गर्दीतली पोरं गडावर कुठेही भेटली तरी दादाला पनवेल वाले अशीच हाक मारू लागले. इतकंच नव्हे तर सुवेळा माचीकडे जाताना दादाचा पाय थोडा घसरला आणि पडता पडता वाचला, तेव्हाही तिथली काही पोरं होती, हसत हसत म्हणू लागली, “अरे अरे, पनवेल वाले पडले.”
तर अशी मजा करत आम्ही आरामात कात्रज घाटातून खाली उतरलो आणि घाट संपताच वाहतूक कोंडीत अडकलो जी २ किलोमीटर लांब होती अगदी कात्रजच्या चौकापर्यंत. जवळपास ४५ मिनिटं लागली आम्हाला कात्रज चौकात यायला. शामलीचं लॉगिन बोंबललं होतं आणि आम्ही अजूनच तिला चिडवत होतो त्यावरून. गाडीतून येताना सगळ्यांकडे फोटोजची मागणी झाली त्यावरून सुद्धा मस्ती.
शेवटी ९:२५ ला पार्किंगमधली गाडी घेऊन घरी निघालो. घरी येऊन शेकत शेकत पाण्याने अंघोळ केल्यावरच बरं वाटलं. पाय कामातून जाणारेत उद्या हे कळलंच होतं. प्रचंड झोप येत होती जेवल्यावर, पण लगेचच लिहावं कोणताही क्षण विसरून जाऊ नये यासाठी. ते म्हणतात ना ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ तसं.
आणि हो या प्रवासात एक नवीन गोष्ट समजली आमच्यापैकी एका सदस्याकडून, ते म्हणजे फणसाचं अत्तर, जे तो सदस्य आवडीने रोज वापरत होता. आता ते कोण हे त्याला वाचल्यावर कळेलच आणि त्या बद्दलची आठवण सुद्धा.
तर पुन्हा भेटू अशाच गोड आठवणी डोळ्यांपुढे उभ्या करण्यासाठी. तोवर, निरोप घेतो.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top