आज लॉकडाऊन या पद्धतीने जगण्याला १ आठवडा झाला.
आपण त्याला सरावलो, चिडलो, हैराण झालो अश्या अनेक प्रतिक्रिया
समोर आल्या. कोणत्याही भावनेने असो, पण जीव वाचवण्याच्या भीतीने
आपण त्याला स्वीकारले आणि अजून पुढील काही दिवस स्वीकारणार.
ह्या आठ दिवसात घरातील “ती” च्यासाठी अनेक कौतुक-उद्गार निघाले, टाळ्या आल्या.
पण खरी कथा आता सुरु होणार.
तसं बघितलं तर प्रत्येक घरातील राहणीमान त्या घरातील येणाऱ्या पैश्यावर
अवलंबून असते. बहुतांशी हा पैसा पुरुषाने केलेल्या मेहनतीअंती येतो,
आणि म्हणून आपली संस्कृती पुरुष प्रधान.
पैसा येणं जितकं महत्वाचे आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे ते त्याचं नियोजन.
आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही काळ पूर्वी नियुक्त झाल्या,
पण प्रत्येक घरात आधीपासूनच निर्मला सीतारामन आहेत म्हणून ते सुरळीत आहे
हे मान्य केलेच पाहिजे.
प्रत्येक घरातील या अर्थमंत्र्याला एक आठवड्यात कळले आहे की
पुढील काही महिने किंवा वर्षे तिचे बजेट कोलमडणार आहे.
आर्थिक मंदी, हवामानातील बदलामुळे वाढणारे जीवनावश्यक वस्तूंचे भाव,
सर्वांच्या घरात असण्याने विस्कळीत झालेले नियोजन अशी अनेक कारणे तिला कळत आहेत.
तरी ती खंबीर आहे, धीराने पुढच्या तयारीला लागली आहे. बोलत नाही पण आतून थोडी धास्तावली पण आहे.
ह्याचा परिणाम तिच्या वागण्यात दिसला नाही तरच नवल.
म्हणून कोणी रुसतंय, फुगतंय, मौन होतंय, चिडतंय, कधीतरी मुन्नाभाई MBBS मधील
बमन इराणीसारखे अकारण हसतंय पण.
ह्या सगळ्या मागील कारण वेगळेच आहे. लॉकडाऊनचा सामना करत असलेली ही
दुर्गेची लेक-“डाऊन” अनुभवते आहे पण एवढे नक्की की जसा काही काळ लोटला
की लॉकडाऊन संपणार त्या आधी ही लेक-“अप” होणार.
तोपर्यंत थोडी कळ काढुया. तिला परत दुर्गा, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी व्हायला वेळ देऊया,
आणि ह्या संघर्षानंतर ची लढाई जिंकण्याची तयारी करूया.
🙏🏻🙏🏻🌹सौ रूपाली साठे🌹🙏🏻🙏🏻