विरह…(आणि त्याची मजा)

विरह म्हणजे काय गं?
जेव्हा दोन माणसं एकमेकांना भेटू शकत नाहीत,
पण खूप, तीव्र आठवण येते तोच विरह ना?
पण या विरहातही वेगळीच मजा असते,
हे तुला पण पटतंच ना?…

शेवटचं केव्हा भेटलो हे ना तुला आठवत, ना मला,
पण त्या आठवणींमुळेच अजून एवढा
तग धरून राहिलोय हे तर खरं ना?
आता त्या आठवणी मनात परत जाग्या करून,
हसलीस की डोळ्यात पाणी आलं ते खरं सांग,
माझ्या मनातल्या कोंबड्याने तर खूप जोरात दिलीये बांग…

हा कोंबडा काय ओरडतोय माहितीये का?
म्हणे माझ्या कोंबडीला मला परत भेटायचंय,
खुराड्यासारख्या अगदी स्वच्छ जागेत का होईना,
पण पुन्हा एकदा काही काळ विरहाच्या झळा सोसण्यासाठी,
आठवणींचा डब्बा भरायचाय…

डब्बाच काय, एक अख्खी मालगाडी पण नाही पुरणार,
अशा आठवणी साठवायच्या म्हटल्या तर,
आणि खरंच माझं जगणं मुश्किल होईल,
तुझ्या सोबतीने आयुष्य नाही घालवता आलं तर..

आपल्या विरहावर कविता लिहायला गेलो आणि काय हे लिहीत बसलो,
स्वतःच्याच खुळेपणावर मी एकटाच बसून हसलो…

– शब्दार्थजीवन

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top