संवाद

संवाद ही नात्यांची चावी आहे – अनामिक 

संवाद… संवाद आपलं दैनंदिन जीवन चालवतो. तशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या या दैनंदिन जीवनासाठी खूप गरजेच्या आहेत पण त्या बाकीच्या गोष्टींपेक्षा संवाद ही खूप महत्वाची वाटते. आपण जर एकमेकांशी जर संवाद केलाच नाही तर रोजची कामं  किती अवघड होऊन बसतील ? आपण सरळ अश्मयुगीन काळात जसे इशाऱ्याने बोलत असावेत तसे केल्यासारखे दिसू. म्हणजे आपण हातवारे किंवा इशारे करून काही कामं, काही भावना व्यक्त करू शकतो. पण… काहीच… जसं बाजारातून वस्तू विकत आणणे, घरी जेवण करताना हे दे, ते दे असं इशाऱ्याने सांगणे. पण आपण प्रेम व्यक्त करू शकतो ? एखाद्याची माफी मागू शकतो ? एखाद्याची स्तुती करू शकतो ? एखाद्याला रागावू तरी शकतो का ? – नाही.

पण मित्रांनो, तुम्ही म्हणाल की जे बोलू शकत नाहीत ते पण तर आयुष्य जगतात आणि या सगळ्या गोष्टी करतात. हो ! करतात ते. पण त्यांना ते खूप कठीण जात असतं. आपण जर बोलू शकत असूनही आपल्याला एखाद्याशी बोलताना समस्या जाणवतात तर त्यांना त्या किती जाणवत असाव्यात. पण पहिली गोष्ट म्हणजे संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे आणि फक्त बोलूनच संवाद करता येतो असं नाही. त्यातही काही मर्यादा आहेत ज्या बोलताना जाणवत नाहीत म्हणून काय ते शब्दांचे महत्व आहे. नाहीतर प्राण्यांमध्येसुद्धा दैनंदिन गरजा आणि भावना न बोलताही भागवल्या जातात, पूर्ण केल्या जातात.

जसं  मी शब्दांबद्दल बोललो तसंच संवादाबद्दल पण. कारण शब्द ( आणि इतर गोष्टी ) मिळूनच तर संवाद होतो ना. त्या इतर गोष्टी म्हणजे आपले हावभाव ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉडी लँग्वेज म्हणतो. आणि ( उत्तम ) संवाद कसा साधावा याचं  प्रशिक्षण देणारे यात अजून खूप गोष्टींची भर घालू शकतात पण आपण सध्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हिशोबाने विचार करूया. तर संवाद म्हणजे फक्त बोलणं नव्हे तर त्यात आपल्या भावना सुद्धा असाव्यात. जसं आपण कधीकधी कुणाचं बोलणं ऐकून म्हणतो ना कि ” कोरडं कोरडं नको रे बोलू. शब्दांत कसा ओलावा असावा. ” तसं. म्हणजे थोडक्यात काय तर मनापासून बोललो तर तो संवाद. समोरचा आपल्याला त्याच्या मनातलं सांगत असेल, त्याच्या समस्या आपल्यासोबत वाटून घेत असेल पण आपण फक्त ऐकतच आहोत आणि त्याला बरं वाटावं म्हणून काहीतरी बोलतो तो संवाद नव्हे. आपण त्याच्या समस्या, दुःख समजावून घेऊन त्यावर त्याला समजावून सांगत आहोत, त्याच्या समस्यांवर आपल्याकडे उपाय नसला तरी त्याला धीर देत आहोत तर तो संवाद होतो. ( पण हे म्हणजे खोटी आशा दाखवणे नव्हे ).

संवाद म्हणजे आपल्या मनातले विचार समोरच्याला सांगणे. ज्यामुळे नाती टिकतात आणि कधी कधी त्यामुळेच तुटतातही. कारण आपले विचार हे ना दिसतात ना ऐकू येतात, पण आपण त्यांना शब्दांत मांडायचा प्रयत्न करतो. आणि तिथे चुकल्यामुळेच गैरसमज होतात. कधी खरं बोलल्यामुळे, कारण खरं बोललेलं लोकांना पचत नाही आणि कधी कधी त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो खरं बोलल्याने. तर कधी खोटं बोलल्याने आपल्यासोबत धोका केला आहे या भावनेने. त्यामुळे आपले विचार आणि आपण कोणते शब्द वापरून संवाद साधतोय याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top