ठिकाण – पराठा स्पेशल हॉटेल
वेळ – दुपार
तो नुकताच हॉटेल मध्ये येऊन ऑर्डर देऊन ती येण्याची वाट पाहत बसला होता.
थोड्या वेळाने ती आली. त्याची ऑर्डर. आलू पराठा. मोठ्या चवीने तो खाऊ लागला.
पहिलाच घास घेऊन त्याने मान वर केली आणि त्याला खरी ती दिसली.
नाकी डोळी सुंदर… छान टॉप काळ्या रंगाचा, त्यावर सफेद ठिपके…
तिला पाहिलं आणि धस्स झालं काळजात.. इतकी सुंदर होती ती..
त्याला जाण्याची घाई.. पटापट खाऊ लागला तो. सोबतच मध्येच एक नजर वर.. तिच्याकडे..
ती कदाचित वाट पाहत असावी कोणाची तरी. काही वेळाने हे साहेब खाण्यात गुंतले असताना
यांची नजर पुन्हा वर गेली आणि…ती गायब झाली.. नीट पाहिलं तर ती काही टेबल सोडून
उलट्या दिशेला तोंड करून बसली होती.. सोबत मित्र, कदाचित खास मित्रा असावा..
या साहेबांचं मन हिरमूसलं.. पराठा संपत आलेला असून त्यातून मन उडालं.
पण… साहेबांचा ऍटिट्यूड तर खूपच पॉझिटीव्ह…
साहेबांनी नवीन दृष्टिकोन घेऊन विचार करायला सुरुवात केली..
आता नवीन विचार असा – कदाचित तिला मला बाहेर जाताना पाहायचं असेल कि हा कुठे चाललाय ?
असू शकतं ना?
याच सकारात्मक विचाराने साहेबांनी पटकन पराठा संपवला…
