रोजची तळमळ आता सहन होत नाही
त्या सर्व गोड आठवणी
विसरण्याचा प्रयत्न करतो आहे
होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे…
इतकी वर्षं उलटूनही
तू माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीस,
नवीन आठवणींच्या अडथळ्यांची
एक एक वीट रचतो आहे…
होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे…
आयुष्याच्या अशा दरवाज्यावर उभा मी,
जिथून मागे फिरता येत नाहीये,
उंबरठा ओलांडून पलीकडे गेल्यावर
परतण्याचा मार्गच बंद होत आहे,
मनात इच्छा नसतानाही ते दार ओलांडतो आहे,
होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे…
मोठमोठाली स्मारकं बांधून
लोक त्यांना विसरून जातात,
त्याच हेतूने मी हे दुष्कर्म करतो आहे,
होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे…
या स्मारकाच्या विटा लालेलाल
त्यात माझ्या काळजाचे तुकडे मिसळतो आहे,
कधीकाळी ज्या आठवणींचे मनोरे रचून खुश व्हायचो,
त्याच आठवणींनी आज या स्मारकाचा पाया रचतो आहे,
होय, मी तुझ्या आठवणींचं स्मारक बांधतो आहे…
तोही दिवस येईल कदाचित जेव्हा हे स्मारक पूर्ण होईल,
भारलेल्या मनाने आणि भरलेल्या डोळ्यांनी
निरोप घेताना मी स्वतःला पाहतो आहे,
होय, मी ……. !!!
– शब्दार्थजीवन