सन १९४७ ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. खूप वीरांच्या बलिदानाने. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा मान राखलाच पाहिजे, आदर पाहिजेच त्याबद्दल. पण आज देशात स्वातंत्र्य असताना अनेक ठिकाणी, अनेक परिस्थितीत पारतंत्र्यात असल्याची भावना काही लोकांना जाणवतेय. नाही !! हा लेख राजकीय नाहीये आणि यापुढील लेखही नसतील. आपण आपल्या लेखात भावनिक, वैचारिक आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातल्या समस्या मांडत असतो इथे.
पारतंत्र्य, खाजगी कंपन्यांमधलं – उदाहरण म्हणून हा विषय मांडतो. तर असं आहे कि इंग्रज १५० वर्ष आपल्यावर राज्य करत होते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार जाताना ते सॉरी सारखे शब्द ठेवून गेले, तर काही म्हणतात की चहा देऊन गेले. हे काही फार मोठं नाहीये, पण खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सो कॉल्ड सॉफ्टवेअर इंजिनिर्सना; किमान काहींना; असं नक्कीच वाटतं की आपल्यावर अजून तेच राज्य करतायत. म्हणजे एखादी बडी कंपनी जी परदेशातली आहे आणि तिचे ऑफिस भारतात पण आहेत, जे सपोर्ट ऑफिस असतात, त्यांना त्या परदेशातील लोकांच्या सोयीनुसार काम करावं लागतं. म्हणजे त्यांच्याकडची सकाळची कामाची वेळ म्हणजे भारतातली रात्रपाळी. आता पैशासाठी रात्रपाळी करावी लागते. त्याने तब्ब्येत बिघडते, कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. यातूनही काहीजण हे सगळं सांभाळतात पण त्यांना कधीनाकधी ही भावना स्पर्शून जातेच.
तर हे झालं खाजगी कंपन्यांमधलं. पण तसंच वैयक्तिक जीवनातही अजून बऱ्याचजणांना स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. अजून बऱ्याच लोकांना स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य नाहीये. कौटूंबिक उदाहरण द्यायचं झालं तर आजही बरीच लग्न ही अरेंज मॅरेज असतात. घरच्यांनी स्थळ बघून कांदेपोहे खाऊन जमलेलं लग्न. तशी ही लग्नं बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेली दिसतात, पण बाहेरून. आतून प्रचंड वाद, तणाव, रोजच्या जीवनातील मतभेद हे सगळं ते लपवून ठेवत असतात. स्वतःच्या इज्जतीसाठी.
बरीच मुलं / मुली आपले आई वडील किंवा जवळचे नातेवाईक, किंवा मध्यस्थ असं म्हणल्याने की “समोरचा मुलगा किंवा मुलगी चांगली आहे” यामुळे लग्नाला होकार देतात आणि त्यात त्यांची चूक नसते. कारण त्या व्यक्तीबद्दल चित्रंच असं रंगवलं जातं की ती व्यक्ती खूप समजूतदार, निर्व्यसनी आणि प्रेमळ आहे. आणि ज्या लोकांकडे चौकशी केली जाते ती माणसं त्या व्यक्तीच्या जवळची असल्याने त्या व्यक्तीचे दुर्गुण सांगत नाही. एखादा मुलगा दारू पिणारा असला तरीही ” अरे त्याचं लग्न शेवटी जुळतंय तर नको सांगायला असं काही. सुधारेल तो लग्न झाल्यावर ” असं म्हणतात आणि सांगून टाकतात खोटं. आणि बऱ्याचवेळा त्यांचा अंदाज खरा ठरतो सुद्धा. पण काहींच्या बाबतीत परिस्थिती हाताबाहेर जाते आणि जो मध्यस्थी असतो त्याच्या नावाने शंख केला जातो. काहीजण लगेच वेगळे होतात तर काहीजण नशिबी असलेलं स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण नेहमीच हा प्रयत्न यशस्वी होतो हे सांगू शकत नाही. मुलं मग आपल्या नशिबाला दोष देतात तर काही आपल्या पालकांना. काहीजण त्यांना त्रास नको म्हणून सगळं शांतपणे गिळून टाकतात.
पण असं का होतं ? पालक आपल्या मुलांवर आपला हक्क आहे असं वागतात म्हणून ? त्यांच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात म्हणून ? की त्यांना अजून आपल्या मुलांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे याचं भान नसतं ? म्हणजे मुलांनी आईवडिलांना सांभाळणं हा भारतात अलिखित कायदाच आहे आणि त्यात काही वावगं नाहीये म्हणा, पण प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाल्यावर ती गोष्ट वाईट होते. काही न्यायालयीन खटल्यांचे निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निर्णय दिलेले आहेत की मुलांना आपल्या आई वडिलांना सांभाळावे लागेल नाहीतर त्यांना त्यांच्या संपत्तीत काहीही मिळणार नाही. अमेरिकेत तसं नाहीये. लहानपणापासून मुलांना वेगळ्या खोली झोपवलं जातं. त्यांचं वेगळं अस्तित्व आहे हे त्यातून मुलांना जाणवतं. मोठे झाल्यावर मुलांना त्याच घरात राहणं अनिवार्य नसतं. मुलं वेगळी खोली घेऊन वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या शहरात राहू शकतात. त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करू शकतात. ( यातही काही अपवाद आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन आम्ही करत नाही. ) तसं भारतात बिलकुल नसतं. मागच्या काहीच दिवसात तर अशीही बातमी ऐकली की मुंबईतल्या एका मुलाने त्याच्या आई वडिलांविरुद्ध खटला दाखल केला हा विषय ठेवून की ” तुम्ही माझ्या मर्जीविरुद्ध मला जन्माला घातलं “. ही बातमी कळल्यावर लगेच सगळ्या मीडिया चॅनेलनी फक्त हीच हेडलाईन दिली आणि विषय उचलला, काही काळापुरता, ज्यामुळे त्यांची TRP वाढण्यास मदत झाली. पण त्यातला गर्भितार्थ काहीच जणांनी समजून घेतला. जर कुणी त्याने जे काही म्हटलंय ते नीट ऐकलं असेल, वाचलं असेल, त्यांना ते समजलं असेल. त्यांनी ते आचरणात आणलं असेल असं नाही म्हणू शकत कारण काहीजण गीता-कुराण वाचून सुद्धा चुकीची कामं करतातच. असो. त्यात त्यानेसुद्धा हाच विषय मांडलेला की भारतीय पालक आपल्या मुलांवर आपला अधिकार आहे असं वागवतात आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातले निर्णयही स्वतःच घेऊ पाहतात. तुझं ह्याच मुलासोबत लग्न झालं पाहिजे किंवा या मुलासोबत लग्न नाही करायचं तू. त्यात बरेच विषय असतात कि त्यांच्या मुलाने निवडलेला जोडीदार कसा आहे ? पण काही पालक तर तेही विचारण्याचं सौजन्य दाखवत नाहीत. ” नाही !! तो / ती अमुक जातीची आहे, नाही चालणार. आपण दुसरा मुलगा बघू, चांगला “. भलेही त्या दुसऱ्या मुलाकडे चांगला पगार असलेली नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, खूप सारा पैसा असेल, जमीनजुमला असेल, सर्वात महत्वाचं चांगला स्वभाव असेल. पण आपल्या पाल्याचं त्या नात्यात सुख असेल का ? हे मात्र स्वतःला विचारत नसावेत असे पालक. त्यांना फक्त आपल्या पाल्याचं सुख बघायचं असतं पण वरून दिसणाऱ्या सुखापेक्षा आंतरिक, मानसिक सुख त्याला मिळणार आहे का याचा विचार मोजकीच लोकं करतात.
मुलं लग्न करतातही आपल्या पालकांच्या म्हणण्यानुसार, पण त्यांच्यासाठी ही तडजोड असते. त्यांच्यासमोर इतर काही पर्याय उरला नसल्यामुळे ते तो निर्णय घेतात. पालकांना ते दिसून येत नाही, किंबहुना मुलं त्यांच्या भीतीपोटी ते दिसू देत नाहीत. पालक असं लग्न लावून देतात पण त्यांना हे कळत नाही की असं मुलांचं लग्न तर होतं पण मुलं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतात. आयुष्यातील प्रत्येक एका ठराविक टप्प्यानंतर माणूस बदलत असतो, त्याची भूमिका बदलत असते आणि त्यासोबत जबाबदारी बदलते अथवा वाढते. लग्नानंतर सुद्धा माणूस बदलतो. मुलगा असेल तर तो नवरा बनतो, काही काळाने बाप बनतो आणि अशी बरीच नाती जोडली जातात जी त्याला सांभाळावी लागतात. मुलगी असेल तर ती बायको बनते, घरातली सून बनते, आई होते आणि अजूनही इतर नाती सांभाळते. पण अशा जबरदस्तीच्या किंवा मुलांच्या मनाचा विचार न करता लावून दिलेल्या लग्नात मुलं स्वतःला हरवून बसतात. जबाबदारी म्हणून ते नातं निभावतात आणि आयुष्य काढतात. त्यांच्या आयुष्यात असं काही उरत नाही की ज्यासाठी ते झटून काम करतील किंवा एखाद्या छंदासाठी आपला वेळ देतील. सगळंच एकाच पठडीतलं होऊन जातं. ” रोजमर्रा की जिंदगी ” म्हणतात ना तशातलं. मग त्यांच्यातून चांगले पालक पण बाहेर येत नाहीत. मुलं घडवण्याचं काम चांगल्या पालकांकडून किंवा मन सुस्थितीत असलेल्या पालकांकडून चांगले होते. ( अपवाद आहेत बरेच ). आणि ते या बाबीत होत नाही. मुलांवर सुद्धा त्यांच्या नात्यांचं दडपण येतं. तीसुद्धा त्याच तणावाखाली वावरतात. आणि मुलं तर देशाचं भवितव्य असतात. त्यामुळे असे घेतलेले निर्णय जे एखाद्याचं स्वातंत्र्य, अस्तित्व हिरावून नेणार असतील, पर्यायाने समाजाला अप्रत्यक्षरित्या पोखरून काढत असतील तर याचा विचार करायला हवा ना ?
वाचकहो, तुम्ही पालक आहात का ? अथवा भविष्यातील असाल तर तुम्हाला असं वाटतं का की आपणच आपल्या मुलांचे निर्णय घेतले पाहिजेत ? की त्यांना त्यांचे निर्णय घेऊन अनुभवरूपी शिक्षकाकडून शिकू द्यावं आयुष्य ?? आपला सल्ला, अनुभव, नक्कीच त्यांना उपयोगी पडेल पण त्यांना निर्णय घेऊन तर बघू दे. खरं आयुष्य कसं असतं हे जगून तरी बघू दे…
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा या लेखाबद्दल.
धन्यवाद,
– शब्दार्थजीवन