
शब्द… काय असतात हे शब्द? एकापेक्षा जास्त अक्षरांनी मिळून जो तयार होतो तो शब्द अशी साधीसुधी व्याख्या. पण खरेच हे शब्द इतके साधे सुधे असतात? कधी असतातही. पण कधीकधी त्यांचा वेगळाच किंवा तसा अर्थ काढला जातो कदाचित, समोरच्या माणसाकडून.
शब्द म्हणजे कधी अमृताहुनी गोड तर कधी विषाहूनीही जहाल. कधी कुणाच्या मनाला पाझर फोडणारे तर कधी एखाद्याच्या मनाला कधीही न भरून काढता येणारी जखम करून देणारे. जो जसा अर्थ घेईल तसा अर्थ. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात तसं व्यक्ती तितके शब्दांचे वेगवेगळे अर्थही आणि त्यातून तयार होणारे दृष्टिकोन. शब्द जपून वापरावे म्हणतात कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द परत येत नाही असं म्हणतात. हल्ली सामाजिक माध्यमातही तसंच पाहायला मिळतं. उदा. व्हाट्सएप्प मध्ये आधी चुकून एखादा संदेश पाठवला तर तो परत घेता येत नसे. आताही नाही घेता येत पण जर तुम्ही ७ मिनिटांच्या आत ते लक्षात येऊन तो संदेश खोडला किंवा काढून टाकला तर ते शक्य आहे. पण हे लक्षात यायला भानावर असणं गरजेचं आहे आणि आजकाल इतके गट तयार झालेत आणि संदेश पुढे पाठवण्याची स्पर्धा लागलेली असते कि त्यात हे लक्षात राहणं जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे किती जणांची प्रतिमा मलीन झालीये आणि मग काय परिणाम होतात हे त्यांना कळालंच असेल. असो.
शब्द हे बदलत असतात नात्यांनुसार. आई-मूल, वडील-मूल, मित्र, मैत्रिणी, शिक्षक, लहान मुलं या प्रत्येक श्रेणी नुसार आपले शब्द बदललेले दिसतात. त्यांची उदाहरणं देण्याऐवजी तुम्हीच ती आठवून पाहू शकता. मग काही शब्द प्रमाण भाषेत असतात काही शब्दांचा अपभ्रंश होऊन दुसरे शब्द किंवा दुसरी भाषाही तयार होते. जशी आपल्याकडे प्रत्येक गावाची भाषा असते ती याचमुळे. एक साधं उदाहरण म्हणजे – आयचान. माझ्या मामाच्या गावी ऐकलेला हा शब्द. त्याची फोड मला खूप दिवसांनी कळली. आयची आन किंवा आईची आण म्हणजे शपथ अशी.
हेच शब्द जेव्हा रागात असलेल्या माणसाच्या मनात येतात त्यांचे अपशब्द, साध्या भाषेत, शिव्या होतात. ( शिवी या शब्दावर सुद्धा आपण पुढील लेखात वाचू शकाल.) पण ते सुद्धा शब्दच असतात जसे कौतुकास्पद असतात तसे, राग व्यक्त करण्यासाठी काढलेले. पण या शब्दांनी जबरदस्त भांडणं जुंपतात. समोरच्याला क्रोध येईल असे असतात हे शब्द. गौतम बुद्धांच्या एका गोष्टीत जेव्हा एक माणूस त्यांना येऊन शिव्या देतो किंवा अपशब्द वापरतो, तरीही ते शांत असतात. खूप वेळ बोलूनसुद्धा ते शांत राहिल्यावर तो अजून रागावतो आणि विचारतो कि तुम्ही अजून शांत कसे? त्यावर ते म्हणाले कि जर तू एखादी गोष्ट देऊ केलीस पण मी ती घेतलीच नाही तर ती कुणाकडे राहील? तो म्हणतो, माझ्याकडेच. गौतम बुद्ध म्हणाले कि या शब्दांचंसुद्धा तसंच आहे. मी तू दिलेले अपशब्द स्वीकारलेच नाहीत त्यामुळे ते तुझ्याकडेच राहिलेत आणि म्हणून मी शांत आहे.
याचप्रमाणे आपण केलं तर? शब्दांचा योग्य अर्थ लावायला शिकलो तर? कारण त्यामुळे मला वाटतं बरीच भांडणं होणार नाहीत, बरीच नाती तुटण्यापासून वाचतील. काय?
मला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांमधून. हा लेख आवडला, नाही आवडला, काही किंवा खूप सुधारणा हव्या आहेत. जे बदल तुम्हाला सुचत असतील तसे कळवा. मी नक्की प्रयत्न करेन ते स्वीकारण्याचा.
धन्यवाद,
शब्दार्थजीवन
