‘ती’

अनन्यसाधारण महत्व आहे या शब्दाला. जसं पाण्याविना कोणताही प्राणी राहू शकत नाही तसंच या पृथ्वीतलावरचं सगळं जीवन बिघडून जाईल, जर ‘ती’ नसेल तर…

ती – आपल्या आयुष्यात असणारी. अनेकविध रूपात. वेगवेगळ्या भूमिकेत. वेगवेगळ्या नात्यात.

आई… – निसर्गाने आपली नाळ जोडूनच दिलेली असते तिच्याशी. ९ महिने आपल्या उदरात वाढवलेला आपल्याच शरीराचा भाग, आपलं मूल होऊन आपल्या समोर पाहणं हे किती सुखावह असतं हे एक स्त्री, एक माताच जाणू शकते. असह्य अशा प्रसववेदनाही गायब होतात जेव्हा डोळ्यांसमोर बाळाचा चेहरा येतो. त्याच बाळासाठी आयुष्यभर झटते, ‘ती’. त्याने नीट चालण्यासाठीपासून त्याने चांगलं बोलण्यासाठी, त्याच्या सुखासाठी, चांगलं शिक्षण घेण्यासाठी, समाधानी आयुष्य जगण्यासाठी कायम झटत असते. बाबा निवृत्त होतात सेवेमधून. ‘ती’ नाही होत कधी…

बहीण – आईनंतर आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी ‘ती’. लहान असेल तर चिडवणारी, भांडणारी, खोड्या काढणारी, आपल्या (खास) मित्र किंवा मैत्रिणीच्या नावाने चिडवणारी…मोठी असेल तर आपली काळजी घेणारी, आपल्याला अभ्यासात मार्गदर्शन करणारी, शाळेत कुणी मारलं तर त्याला दम देणारी, आपल्याला खाऊ घेऊन येणारी, आपली चूक झाल्यावर आई किंवा बाबांच्या मारापासून वाचविण्यासाठी आपल्याला तिच्या मागे लपवणारी, एखादी वस्तू आपल्याला मिळावी यासाठी स्वतः काहीतरी त्याग करणारी, कुणी खास मैत्रीण आहे असं कळाल्यावर, ” काय रे, अमुक अमुक मूलगीसोबत हल्ली जास्तच बोलणं चाललंय. वहिनी होणार की काय आमची ती ? ” असं खोचक पण मस्ती करणारा प्रश्न विचारणारी, लग्न झाल्यावर सुद्धा आपली काळजी घेणारी.. अशी ‘ती’.

मैत्रीण – आपलं घर सोडून बाहेरची पहिली स्त्री जिच्याशी आपलं मैत्रीचं नातं जोडलं जातं आणि हळूहळू ते घट्ट विणलं जातं.. रक्ताच्या नात्यासारखंच. आपल्याला अभ्यासात मदत करणारी, पोरींसोबत राहतो असं कुणी म्हणल्यावर त्यांना हटकणारी किंवा मग त्याबद्दल आपली समजूत घालून देणारी, आपल्याला कायम समजून घेणारी, कधी चिडली तरी स्वतःच सॉरी बोलणारी, कधी किंवा बऱ्याचदा आपल्या अभ्यासाच्या / गृहपाठाच्या वह्या पूर्ण करणारी, आणि त्याबद्दल मग महागड्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये नेऊन मोठ्ठं बिल फाडून देणारी, आपल्या प्रेम-प्रकरणावेळी आपला संदेशवाहक असणारी, कधी जर आपली प्रेयसी तिला आवडली नाही तर बेधडक तसं बोलणारी, त्यावरून आपली खिल्ली उडवणारी, अडचणीत आपल्यासोबत असणारी अशी ती…

( कधीकधी ही घट्ट मैत्रीण आपली सखी-सोबतीण बनते आयुष्याची. आणि मग त्या प्रवासात कायम साथ देणारी ‘ती’… )

प्रेयसी – शाळा किंवा महाविद्यालयात अचानक दिसलेली आणि मनात भरलेली ती, लव्ह-ऍट-फर्स्ट-साइट ही कल्पना खरी आहे याची जाणीव करून देणारी, आपणही तिला आवडलो तर एक मारक स्मितहास्य देऊन काळीज काढून नेणारी, समोर येताच आपल्या हृदयाची धडकन वाढवून पॅसेंजर ते राजधानी एक्सप्रेसवर नेऊन पोहोचवणारी, आपल्या मित्रांसाठी तिचं नाव हे आपलं टोपणनाव झालेली, आपण कोणत्या स्पर्धेत भाग घेतला तर कधी उस्फूर्तपणे तर कधी पडद्यामागून आपल्याला पाठिंबा देणारी, आपल्या बेढब नृत्यविष्कारावर सुद्धा, ” बाकी कुणाला आवडो ना आवडो, मला तर खूप आवडला तुझा डान्स” अशी मनापासून दाद देणारी, महाविद्यालयानंतर पहिल्या नोकरीच्या पहिल्या मुलाखतीसाठी आपल्याला धीर देणारी, आयुष्यात कोणत्याही दुःखद प्रसंगी, ” होईल रे सगळं नीट ” अशी मनाची समजूत घालून देणारी, आपल्याला अशा असंख्य जाणिवा, ज्या आपल्याला तिच्या कृतींमधून, आपल्या तिच्यासाठीच्या काळजी मधून करून देणारी, घरी प्रेमप्रकरण कळाल्यावर आपल्या बाजूने उभी राहणारी, आपली बाजू घरच्यांना समजावून सांगणारी, आणि वेळप्रसंगी सगळ्यांच्या भल्यासाठी, ” मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. माझे घरचे म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करणारे ” असं सांगून निघून जाणारी, अर्थात त्या मागे तिचा केवढा मोठा त्याग आहे हे न समजणारे आपण आणि आपल्या घरच्यांसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करणारी ‘ती’…

पत्नी – आयुष्यभरासाठी सोबत राहण्याचं वचन देऊन आपल्या घरी आलेली, आपल्यासाठी तिचं लाडकं घर, लाडका बाबा, आई, हे सगळं सोडून आलेली, “आता माझं सासर हेच माझं घर, आणि हीच माझी माणसं” असं म्हणून त्यांच्यासाठी अपार कष्ट घेणारी, आपलं सर्वस्व आपल्याला अर्पण करणारी, आपल्या कुटुंबाला तथाकथित ( so-called ) वंशाचा दिवा देणारी, आपल्याला रोज चविष्ट व्यंजने खाऊ घालणारी, तर तेच जेव्हा डबा भरलेला तसाच घरी आला म्हणून दोन दिवस तेच ऐकवणारी, शेजारच्या अमुक अमुक गृहस्थाने त्याच्या बायकोला हे घेतलं, त्याचं किती प्रेम आहे ना तिच्यावर ? असं बोलून अप्रत्यक्षपणे त्या वस्तूची मागणी करणारी, आपल्याला उधळ्या घोड्यावरून काटकसरी खेचरावर आणून सोडणारी, आपलं सगळं घर मॅनेज करणारी, आपल्या माणसांची आपुलकीनं देखभाल करणारी, आजारीपणातही तक्रार न करता अविरत झटणारी, आपल्या मुलांवर संस्कार करून आपल्याबद्दल त्यांच्या मनात इज्जत भरून देणारी, आपलं नाक कापलं जाऊ नये म्हणून मुलांना सक्त ताकीद देणारी, जीवनाच्या प्रत्येक चढ-उतार,सुख-दुःखात साथ देणारी, आणि माहेरी गेल्यावर सलील कुलकर्णी यांच्या गाण्यानुसार तिची आठवण यायला भाग पाडणारी, तिची कमी जाणवून देणारी अशी ती…

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो,

जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो” ||

मुलगी – हिच्याबद्दल काय म्हणावं ? म्हणावं तितकं थोडंच आहे. लहानपणी एक सुविचार किंवा घोषवाक्य म्हणा, ते वाचलं होतं कि, ” मुलापेक्षा मुलगी बरी , प्रकाश देईल दोन्ही घरी !! “. एकेठिकाणी एक प्रसंग वाचलेला सांगावा वाटतो कि एक मुलगा एका मुलीला टिपिकल स्टाईल मध्ये प्रपोझ करत असतो. गुडघ्यावर बसून, हातात गुलाब घेऊन करतात तसं . फक्त त्याने प्रपोझ करताना जे बोलतात ते असं काही म्हणाला, ” मी आयुष्यात फक्त दोनच स्त्रियांसमोर असा वाकेन. एक तू ..” ती कुतूहलाने विचारते, ” आणि दुसरी ? ” तो म्हणतो –  आपली मुलगी. आणि तिच्यासमोर वाकेन ते तिच्या बुटांची लेस बांधण्यासाठी. बोल. करशील माझ्याशी लग्न ? ”  आणि मग पुढे काय झालं हे सांगायला नको…

ती… जेव्हा या जगात येते तेव्हा प्रसूतिगृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या चिंताग्रस्त बाबाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणणारी, जेव्हा आईच्या आधी बाबा म्हणायला शिकते तेव्हा बाबाला वरचढ बनवणारी, बाबासोबत त्याचं  बोट धरून चालायला शिकणारी आणि मग हातात हात धरून कायम चालणारी, तिच्या लहानपणी तिचा आधार बनण्यासाठी आणि बाबाच्या म्हातारपणी त्यांना आधार देण्यासाठी, शाळेत नेहमी अभ्यासात अग्रेसर असणारी, कधी खेळातही आपलं नाव गाजवणारी, शाळेत कधी कुणी छेड काढली तर घरात येऊन मुसमुसणारी, किंवा मग तिथल्या तिथे त्याला धडा शिकवणारी, शाळेत किंवा कॉलेजला कुणी मुलगा आवडला तर गालात हसून लाजणारी आणि मग रोज येऊन तशी स्वप्न बघणारी :), आईला घरी सर्व कामात मदत करणारी, लहान भावंडांना आई वडिल घरी नसताना सांभाळणारी, लग्न जमवायच्या वेळी कांदेपोहे आणि चहा आणून देणारी, सासरी जाताना बाबाला रडवणारी, सासरला जाऊनही माहेरच्या लोकांचीही तितकीच काळजी घेणारी, बाबाच्या काळजाचा तुकडा असणारी, हिंदीमध्ये एक गाणं आहे तसं बाबाला जाणीव करून देणारी कि ” भंवरे ने खिलाया फूल, फूल को ले गया राजकुंवर “, जीवापाड जपलेली आपली चिमणी आपलं घर सोडून सासरी जातेय, आता आपल्या घरात तिचा आवाज रोज नसणारे, मस्ती कोण करणार घरात ? हा प्रश्न बाबाच्या मनात येतोच कितीही बालिश वाटला तरीही.

तरुण असताना बाबाला जेव्हा त्याच्या सासऱ्यांनी जसं सावधानतेने त्याची चौकशी वरून लग्न करण्यास परवानगी दिली तसंच तिच्या लग्नाचं वय आणि लग्न होईपर्यंत बाबाच्या जीवाला काळजी लावणारी आणि तशीच जाणीव करून देणारी ती…

आज स्त्रियांचा उत्कर्ष झालाय किंवा त्यांच्या विकासाची क्रांती झालीये असं म्हणू शकतो आपण. कोणत्या क्षेत्रात नाहीये आजची स्त्री ? पण तरीही अजूनसुद्धा त्यांच्या वाट्याला एक वस्तू, उपभोगाची वस्तू याच नजरेने जास्त पाहिलं जातं. समाजात त्यांना मिळणारा मान आजही कमीच आहे. जरी दाखवण्यासाठी खूप लोक आम्ही नारींचा आदर करतो सन्मान करतो असं म्हणत असले तरी त्याच काही लोकांवर आधी बरेचसे अत्याचाराचे गुन्हे दाखल असतात, जे दाबून टाकलेले असतात. अजूनही स्त्रियांच्या बऱ्याच समस्या जगासमोर आल्या नाहीयेत आणि त्या येणं गरजेचं आहे. आपल्यासोबत आपल्या समाजात कधी स्नेहाळ, मायाळू, वत्सल, जीव लागणारी स्त्री असते तर कधी तीच दुर्गा, रणचंडी, कालिका अवतारात येते. तर अशा या विविधांगी नारीशक्तीला साथ देऊया, आणि सगळ्यांच्या विकास करण्याच्या वाटेवर पहिलं पाऊल ठेवूया.

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top