
Think wisely before taking the decision !!!
माझ्या एका जवळच्या गृहस्थांनी मला बोललेलं हे वाक्य – बाळा, एकदा घेतलेले निर्णय बदलता नाही येत सारखे सारखे !!
खरंच असं असतं का हो ? नाही बदलू शकत आपण निर्णय ? का नाही ? जर आपण एखादा निर्णय घाई-गडबडीत, मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत घेतला असेल आणि तो चुकीचा असेल पण अजून त्यामुळे काही नुकसान झालं नसेल तर बदलू शकत नाही ? मला वाटतं बदलू शकतो. पण ते अवलंबून असतं समोरच्या व्यक्तीवर कि ती व्यक्ती तो निर्णय स्वीकारायला तयार आहे की नाही.
निर्णय घेणं कठीण नसतं, कठीण असतं ते त्याचे दुष्परिणाम भोगणं. एखाद्या निर्णयाची गोड फळं चाखणं नशिबी आलं तर सगळे कौतुक करतात, पण त्या निर्णयामुळे काही तोटा झाला कि मग सगळीकडून टीकेच्या फैरी झडायला सुरुवात होते, अगदी मोजकेच आपल्या सोबत असतात. आणि याचमुळे निर्णय घेणं हे कठीण होऊन बसतं. मग हे करु कि नको अशा गोंधळलेल्या, द्विधा अवस्थेत जातं मन. आणि मग ताण -तणाव येतात पाहुणे म्हणून आपल्या मनात. मग कुणी त्या बद्दल विचारणा करताच होणारी चिडचिड, रागराग करणे, हे सुरु होतं. आणि अजूनच किचकट होऊन बसतं निर्णय घेणं. आणि मग शेवटी चिडून, वैतागून काहीतरी निर्णय घेतला जातो. आणि मग वर सांगितल्याप्रमाणेच काहीतरी एक होतं .
कधीकधी आपला निर्णय बरोबर असेल कि चुकीचा हाच विचार करून माणसं पुढेच जात नाहीत. तिथेच अडकून बसतात आणि मग काहीच शक्य होत नाही. आणि काहीवेळा त्यांच्या अशा अडकण्यामुळे इतरांचीही अडवणूक होते. त्यामुळे चूक झाला तरी चालेल पण काहीतरी एक निर्णय घेऊन पूढे जाणं केव्हाही चांगलं. कारण दोन दगडांवर पाय ठेवून कधीच कोणताही निर्णय नाही घेता येत. मान्य आहे कि त्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं, पण तुम्हाला याचं तरी समाधान असतं की आपण काहीतरी एक बाजू निवडली आणि पुढे आलो. हे करू की ते या भानगडीत काहीच न होण्यापेक्षा काहीतरी झालेलं केव्हाही चांगलं. जरी निर्णय चुकला तरी तुम्हाला एक जबरदस्त अनुभव मिळेल ज्याने तुम्ही स्वतःला पुढील आयुष्यासाठी तयार करू शकता आणि तो अनुभव तुमच्याचसाठी पुरेसा न ठेवता जर तुम्ही इतरांसोबत तो शेअर केलात तर ‘ पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ‘ या म्हणीप्रमाणे तुम्ही कित्येक जणांना भविष्यात ठेच लागण्यापासून वाचवू शकता.
पण ‘ आता काहीही सुचत नाहीये, जाऊ दे. काहीतरी एक निर्णय घेऊन पुढे जाऊया. जे होईल ते होईल. ‘ असंही निर्णय घेणं बरोबर नाही. तुम्ही खूप विचार करून, आपल्या विश्वासातल्या माणसांशी बोलून, त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवर विचार करून, त्या निर्णयाचे भविष्यात होणारे फायदे आणि तोटे दोन्हींचा विचार करूनही जर मग नाईलाजाने निर्णय घेतला असेल तर ते समजू शकण्यायोग्य आहे. पण अविचाराने, काहीही सुचत नाहीये, कोणाशीही सल्लामसलत न करता जर निर्णय घ्याल तर लक्षात राहू द्या कि तुमच्या एका निर्णयाने कित्येक आयुष्य उध्वस्त होऊ शकतात. प्रत्येकवेळी असंच होईल असं काही नाही. कधी कधी त्या निर्णयाचे पडसाद, प्रभाव कमी असेल पण प्रत्येकवेळी तसंच होईल असं समजून निर्णय घेऊ लागलात तर तुम्ही चुकीचे आहात. हे करताना हे सुद्धा लक्षात घ्या कि तो निर्णय आपल्या किंवा इतर कुणाच्या जीवावर बेतणार नाही. ‘ सर सलामत, तो पगडी पचास ‘ या हिंदी म्हणीप्रमाणे जर तुमचं जीवन आहे तर तुम्ही काहीही करू शकता. कितीही खोल बुडालेले असलात तरीही वर येऊ शकता, पण जर तुमचं या जगातलं अस्तित्व संपलं, तर मात्र त्याचा काहीच उपयोग नाही.
त्यामुळे निर्णय घेताना सावधतेने आणि योग्य विचारविनिमय करूनच घ्या. प्रत्येकाचं जीवन वेगळं, विचार वेगळे. त्यामुळे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचा हक्क आहे. आता तुम्ही काय निर्णय घेणार आहात आणि कसा ? विचार करून की तडकाफडकी ?
तुम्हाला हा लेख कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांमधून.
धन्यवाद !!!
– शब्दार्थजीवन
