प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…!!!! तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं… !!!!
हम्म.. खरंच असं असतं का ? सेम प्रेम ? किंवा प्रेम सेम ? माझ्या (म्हणजे माझ्या मित्रांच्या ) आतापर्यंतच्या अनुभवावरून तरी नाही. हो हो.. नाहीच. नसतं अहो हे प्रेम सेम सगळ्यांचं… कुणाचं अयशस्वी होऊनही यशस्वी किंवा सुखी असतं आणि कुणाचं यशस्वी होऊनसुद्धा दुःखाच्या सागरातल्या खारट पेयाचे अयशस्वितेचे घुटके घेत बसलेलं असतं, ज्याने जखम झोंबते सुद्धा आणि इच्छा नसतानाही ते प्यावंच लागतं. आता तुम्ही म्हणाल कि प्रेमाला यशस्वी आणि अयशस्वीतेच्या तराजूत किंवा इतर कोणत्याही तराजूत आणि इतर कोणत्याही मापाने कसं काय तोलू शकता ?? तर तोललं जातंय हल्ली त्याला. आणि मी तर फक्त जे खरं आहे ते इथे लिहितोय. एखाद्या मुलगा मुलगीला प्रेम झालं आणि त्यांचं लग्न झालं तर ते यशस्वी आणि नाही झालं तर अयशस्वी हे साधं समीकरण. त्याहीपलीकडे प्रेम असतं याची जाणीव नसते, त्या मुलगा मुलीला पण आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा आणि समाजालासुद्धा. कारण प्रेम करणं म्हणजे अलिखित गुन्हाच मानला जातो. आजही कुणी प्रेमविवाह केला तर त्यांच्याकडे असं काही पाहिलं जातं की त्यांनी काही विचित्रच केलंय. त्यांच्याबद्दल नानाप्रकारे बोललं जातं. पुढे जाऊन जर त्यांचं लग्न टिकलंच तर विसरतात त्याबद्दल लोक आणि नीट वागतात त्यांच्याशी, पण चुकूनही जर त्यांच्यात काही नीट नाही झालं तर मग आयताच विषय मिळतो लोकांना चघळायला… विहिरीवरच्या / नळावरच्या बायकांमध्ये सकाळसकाळी तेच बोलणं. त्यात जर त्या नवविवाहित स्त्रीनं ते ऐकलं तर मग एकतर ती पाणी न भरता नळावरून परत जाणार किंवा बाकीच्या बायकांना चार शब्द सुनावणार. त्या शांत बसल्या तर ठीक, नाही तर मग शाब्दिक चकमक झडलीच म्हणून समजा. मग त्यानंतर घरी येऊन रडगाणं सुरु, तक्रार आणि वगैरे वगैरे. बरं.. हे इथवरच थांबलं असतं तर ठीक. ह्या अशा जोडप्याचा त्रास भावी प्रेमी युगुलांना पण होतो. त्यांचा त्रास म्हणजे त्यात त्यांची काही चूक नसते म्हणा. प्रेमात असणाऱ्या मुलामुलींना घरी हा डोस मिळतोच, की ” अरे तो अमुक अमुक गृहस्थाचा मुलगा माहितीये ना. त्याने पण प्रेमातच लग्न केलं. काय झालं त्याचं ? रोज घरात भांडणं आणि रडारड सुरु असते. तुला पण तेच करायचंय का ? ” या वाक्याचेही दोन प्रकार असतात. सुरुवातीला समजावणीच्या स्वरूपात असतात आणि जर हे सांगूनसुद्धा ते सुरु राहिलं तर मग हेच वाक्य रागाच्या सुरात बोललं जातं. सर्वच घरात किंवा सर्व प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीत असं होतं असं बिलकुल नाही. बरेच पालक आपल्या पाल्याला पाठिंबा देतात आणि योग्य प्रकारे समजावून सांगतात आणि मुलं ते समजून ही घेतात. कधी कधी पालक त्यांना त्यांचं चुकत असेल आणि त्यांना त्या अनुभवातून शक्यतो नुकसान होणार नसेल किंवा कमी नुकसान होणार असेल तर तो अनुभव घेऊ देतात कारण कधीकधी काही गोष्टीनुसत्या सांगून समजत नाहीत. चटका लागल्यावर भाजतं हे सांगून समजण्यात आणि खरंखुरं चटका लागून भाजल्यावर ते समजण्यात खूप फरक आहे. ( कृपया भाजणार आहे असं माहित असून सुद्धा तुम्ही आगीच्या जवळ जात असाल तर कृपया पुन्हा एकदा विचार करा किंवा योग्य ती काळजी घेऊनच मग पुढे जा. )
जात या माझ्या आधीच्या लेखात मी अगदी तपशीलवार माहिती आणि उदाहरणं देऊन ते समजावलं आहे तर मी त्या विषयावर परत जाणार नाही. पण तो खूप म्हणजे खूप मोठा मुद्दा असतो या प्रकरणात. आणि जर कुणी आंतरधर्मीय विवाह करत असेल किंवा केला तर दंगलसुद्धा घडेल इतका मोठा विषय खेचला जातो तो.
मला सांगा प्रेम करणं हा खरंच गुन्हा आहे का हो ? का दुसऱ्या जातीतल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केल्यावर त्याला वाळीत टाकलं जातं ? ती काय माणसं नसतात का ? कि त्यांचं रक्त वेगळं असतं ? प्रेम म्हणजे एकमेकांना आवडणं आणि त्यातून मग एकमेकांची काळजी घेणं. त्यात ओढ लागते एकमेकांची. शारीरिक ओढ असतेच कारण मानवाची नैसर्गिक रचनाच तशी असते आणि त्यानुसार ते योग्यही असतं, पण याचसोबत मानसिक ओढसुद्धा असते. दोन मनांची नाळ जोडली जाते, गुंफली जाते असं म्हणूया. आणि म्हणूनच जेव्हा ती तोडली जाते, तेव्हा खूप त्रास होतो. तुटतानासुद्धा आणि तुटल्यावर सुद्धा. सुंभ जाळल्यावर त्याचा पीळ राहतो ना तसा. त्या नात्यात खूप आठवणी त्यांनी जगलेल्या असतात त्या विसरणं खूप कठीण असतं. कारण आठवणी परतही करता येत नाही आणि विसरताही येत नाही. आता तशा बऱ्याच गोष्टी आणि उदाहरणं आहेत ज्यांनी मी प्रेमात असलेल्यांच्या दैनंदिन कामाची यादी बनवू शकतो पण त्या तुम्हीसुद्धा पहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील आणि नशीबवान असाल तर अनुभवल्या असतील. हो ना !! ते गाणं आहे ना हिंदी सिनेमामध्ये, ” हर किसीको नही मिलता यहाँ प्यार जिंदगी में “, तसं.
प्रेम करणं हा बिलकुल गुन्हा नाहीये. पण मित्रहो (प्रेमाच्या) त्या स्थितीत असताना आपण कसे वागतोय, कसे बोलतोय आणि सर्वात महत्वाचं आपण आपल्या आयुष्यातील निर्णय कसे घेतोय हे खूप महत्वाचं असतं कारण त्यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. त्यात तुमच्या होणाऱ्या जोडीदाराच्या भविष्याचाही समावेश असतोच. प्रेम करत असताना आपण आपली कारकीर्द ( करिअर ) नीट घडवतोय की नाही याचा पण विचार केला पाहिजे. यात काय होतं मित्रांनो, तुमचा किंवा एखाद्या अशा जोडप्याचा निर्णय चुकतो. ते खरंच एकमेकांवर प्रेम करतात की ते फक्त शारीरिक आकर्षण होतं किंवा केवळ काही गुणांवर आकर्षित झालो होतो हेच त्यांना कळत नाही आणि गफलत होते. पुढे लग्न झाल्यावर त्यांना मग बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. दोघे समजदार असतील तर विषय नीट हाताळला जातो आणि बऱ्याचवेळा सगळं सुरळीत होतं. पण काहींच्या बाबतीत असं नाही होत दुर्दैवाने. आणि मग सुक्याबरोबर जसं ओलंही जळतं तसंच काहीसं तुमच्याबाबतीत होतं. प्रेमविवाह करून सुखी संसार करत असणाऱ्या १० टक्के जोडप्यांपेक्षा त्या प्रेमाची वाईट फळं भोगणाऱ्यांची उदाहरणं दिली जातात. आणि त्याचमुळे समाजात प्रेम करणं म्हणजे काहीतरी चुकीचं, विचित्र काहीतरी करणं असंच समजलं जातं. आणि जेव्हा कुणी समजवायला जातं तेव्हा नाना कारणे देऊन, उदाहरणे देऊन तर कधीकधी जीवाची धमकी देऊन गप्प केलं जातं. अंधारातला बागुलबुवा लहानपणी अंधारात जाण्यापासून रोखायचा, पण अशा बागुलबुवांमुळे तरुणांची प्रेम करण्याची मानसिकताच बदलून जाते.
तर मित्रांनो, प्रेम करा. नक्की करा. पण केलंत तर येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला धैर्याने आणि एकत्र सामोरे जा. एकमेकांची साथ कधीच सोडू नका आणि घाबरू तर बिलकुल नका. क्यूँकी प्यार किया तो डरना क्या ?? ( अनुभवाचे बोल )
तुम्ही केलंय का कधी प्रेम ( तरुणपणीचं ) ? केलं असेल आणि असे काही अनुभव आले असतील, तुमचे किंवा तुमच्या मित्रांचेही, तर माझ्यासोबत नक्की शेअर करा कमेंट्समधून.
धन्यवाद,
– शब्दार्थजीवन
There is only one Happiness : To love and to be loved !!
