माझं मन, मेंदू, अंतरात्मा जे काही असतं,
ते विसरलं नाहीये बहुधा तुला,
कारण बऱ्याचदा अजूनही
तू माझ्या स्वप्नात येतेस…
मला तर वाटलेलं
माझ्या इतक्या वर्षांच्या
प्रतिक्षेचं फळ आहेस तू,
पण स्वप्न अर्धवट राहिल्यावर
जी कायम बोचत राहते ना,
ती सल आहेस तू….
तुझे नयन कटाक्ष जशी तू मृगनयनीच,
तुझी कांती जणू सुवर्णमृगीची…
तुझी वाणी मधूपक्व आम्रफल,
तुझे मन जसे निर्मळ जल…
तुझे केश जणू कृष्ण भुजंग दल,
तुला भेटण्या व्हायची जीवाची तळमळ…
पण आता सोबत नसतानासुद्धा
हे सगळं आठवल्याने
हृदयात अचानक येते,
ती कळ आहेस तू,
जी कायम बोचत राहते ना,
ती सल आहेस तू….
तू जवळ असता
धरले मी तुला बहुधा ग्राह्य,
पण आता ढवळून निघतंय,
माझं मन अंतर्बाह्य,
कारण आता… कारण आता
तू माझ्यासोबत नाहीयेस
आणि तुझ्याविना जीवन माझे,
होतेय असह्य…
मला वाटलेलं की माझ्या आयुष्यातला
कस्तुरीसम परिमळ होशील तू,
पण तू तर जी कायम बोचत राहते,
ती सल झालीस तू…
– शब्दार्थजीवन
