
आठवण तर रोजच तुझी येते,
येत नाहीस तर फक्त तू…
इतक्या गोष्टी वाटून घेतल्या आपण,
की प्रत्येक लहान गोष्टीत लक्षात येतो,
तो तुझा संदर्भ…
येत नाहीस तर फक्त तू…
तू सोबत असताना दिवस काय रात्र काय,
भुर्रर्रकन उडून जायचे, कळायचं पण नाही..
दिवस आताही येतात, रात्री आताही येतात,
दिवस रखडत, तर रात्री रडत जातात,
बऱ्याचदा मनातून आणि कधी कधी,
दगड झालेल्या काळजाच्या भेगांमधून
झिरपणाऱ्या अश्रूंतून …
कसेतरी का होईना, पण ते येतात तरी.
येत नाहीस ती फक्त तू…
मला खूपदा भास होतात की तू आलीस,
उभे होतात मनात कारंजे आणि नाचतात थुईथुई,
पण वास्तवाचं भान आता यायला लागलंय,
आणि डोळ्यांवरचा धुसरपणाचा पडदा हटून,
दिसतात मग तेच भग्नावशेष,
त्या आठवणींचे, हृदयाचे, नात्याचे,
समाजाने तोडून मोडून टाकलेल्या मनाचे…
लहान मूल नकळत खेळणं तोडून टाकतं तसं…
त्याचं एकवेळ समजू शकतो की ते शिकत असतं,
पण समाज? त्यांना शिकवायचं असतं किंवा त्यांना
जे जमलं नाही, ते इतरांनीही करता काम नये हा कस असतो मनात. असो,
ते सगळं सोबत घेऊनच चालतोय मी, कारण
ते अदृश्य साखळदंडाने बांधलेच आहेत माझ्या पायांना,
लंगडत, ओढत चाललोय मी आणि ते येतात माझ्यासोबत…
येत नाहीस ती फक्त तू…
तू असताना संकटं काहीच वाटायची नाही,
आता पण नाही वाटत तशी,
फरक एवढंच की आधी तू होतीस म्हणून,
आणि आता जीवनाने खूप अनुभव दिलेत म्हणून…
संकटं तर आताही येतात आणि येत राहतील यापुढेही,
येणार नाहीस ती फक्त तू….
संकटं, सुख-दुःख तर येत राहतातच,
पण आता नसलेली माझ्या आयुष्यात,
पुन्हा कोणी यावं तर ती फक्त ‘ तू ‘ …
क्रमशः …
-शब्दार्थजीवन
(तळटीप – आधी व्यथित झालेला ‘तो’ काहीसा नकारात्मक विचार करत असतो.
नंतर या प्रसंगामुळे सकारात्मकता येऊन असं लिहिलं त्याने.)
