तुझी आठवण येता पुन्हा
आज रडावयास आले मला,
पण आता रडल्यावर कळलं
त्या अश्रूंमधून त्या आठवणी ना,
हळूहळू धूसर होऊन, त्यात मिसळून
वाहून चालल्यात…
कारण आता जगाने अनुभवाचे
चटकेच इतके दिलेत की
त्यांनी त्या अश्रूंची वाफ न व्हावी हे नवलच!!
तुही त्याच अवस्थेत, ज्या मी आहे
फक्त तू स्थिर वाटते आहेस मी मात्र अस्थिरच आहे…
तुला कदाचित ते जमलंय, जे मला अजून जमलं नाही,
कदाचित आजन्म जमणार नाही.. सगळं स्वीकारणं..
तुही झुरतेस मीही झुरतो,
पण तुझं झुरण्याचा झरा
आतल्या आत वाहत जाऊन
एका कोपऱ्यात लपवलास वाटते,
माझा तर क्षणाला उचंबळून वर येत असतो,
म्हणून माझ्या नयनी अजूनही
गंगा जमुना दाटते…
झुरत राहावे की विसरून जावे
हा to be or not to be सारखा प्रश्न आहे,
जगावे तर का? आणि मरावे तर कोणासाठी
हा तर गहनच विषय आहे…
– शब्दार्थजीवन
