का असा मातलास तू?
की वेंधळा झालास तू?
दैवाने दिलेलं दान
स्वकर्माने नाकारायला
लागलास तू!
ज्याला मिळत नाही
त्यालाच त्याची किंमत कळते,
आणि ज्याला मिळतं,
त्याची बुद्धी भ्रष्ट होते…
जे मिळवण्यासाठी
केलीस इतकी धडपड,
ते मिळणार असताना
उगीच कशाला करतोस तडफड…
सबुरीनं घे मित्रा
हे क्षण असतातच असे,
एका चुकीच्या निर्णयाने
बरंच काही इथं बदलताना दिसे…
भविष्याचा अति विचार करताना
आजचा वर्तमान तू विसरतोयस,
संकटं असतील रे समोर
पण असलेली नाती का बिघडवतोयस?
नशीबवान असतात ती माणसं
ज्यांना पाठिंबा देणारी माणसं असतात,
ज्यांना कुणीच नसतं मित्रा, विचार कर त्यांचा,
ती कशी या जगात टिकतात?
जे आहे त्यात समाधान मानून
पुढे चालत राहायचं,
प्रारब्ध हे चुकत नसतं
ते होतंच जे होणार असतं….
– शब्दार्थजीवन
