आयुष्यात मित्रही तसे कमीच आहेत पण खास आहेत,
मैत्रीण नसली तरीही चालतंय असं चाललं होतं,
पण एका मैत्रिणीचं आयुष्यात असणं किती छान असतं,
हे तुझ्या येण्यामुळे कळालं…
आई तिच्या उपवासाच्या दिवशीही
रोजच्याच उत्साहाने काम करते,
हे तुझ्या येण्यामुळे कळालं…
ती उपवास करते तेव्हा तिला काहीतरी खायला द्यावं,
तिला थकवा येऊ नये म्हणून तिचं काही काम आपण करावं,
हे तुझ्या येण्यामुळे जाणवलं…
मासिक पाळीच्या वेळी किती त्रास होतो,
हे तुझ्यामुळे कळालं…
तो त्रास आनंदाने सहन करण्याचं कारण म्हणजे,
ती खूण असते भविष्यातील आईपणाची,
संधी आपल्या साथीदाराला आपल्याच शरीरात
वंशरूपाने वाढविण्याची,
सोबत वाढत असते ताकद आंतर सहनशक्तीची,
त्या दिवसात स्वभावाच्या लहरी बदलण्याला चिडायचं नसतं,
तर प्रेमाने काळजी घ्यायची असते,
हे तुझ्या येण्यामुळे जाणवलं…
मी रक्ताची आणि इतर नाती सुद्धा कमीच जोपासली,
पण कुटुंब आणि माणसं जपण्याचं तुझं हे कौशल्य,
तुझ्याच येण्यामुळे कळालं…
आपली माणसं आपण जपली पाहिजेत,
त्यांच्या गरजेवेळी गेलं तरच आपल्याला कुणीतरी येईल यापेक्षा,
आपल्या माणसांना आपणच मोठं केलं पाहिजे,
हे तुझ्या येण्यामुळे आणि घरच्यांमुळे जाणवलं…
प्रेमावरची पुस्तकंच वाचली होती तू येण्याआधी,
प्रेम प्रत्यक्षात काय असतं, तू आल्यावर कळालं…
तिची/ त्याची सोबत सुटल्यावर किती वेदना होत असतील,
जिवंतपणीच मरणयातना कशा होत असतील,
हे तुझ्या जाण्यामुळे जाणवलं…
तुझ्या येण्यामुळे या सगळ्याची
करून दिलीस तू जाणीव,
तू गेल्यावर आता,
कोण भरून काढणार
या जाणिवांची उणीव…
– शब्दार्थजीवन
